Pimpri : फसवणुकीचा नवा पॅटर्न! ओएलएक्सवर जवानांचे आयडी दाखवून ग्राहकांची फसवणूक

सावधान ! फसवणुकीच्या नवीन जाळ्यात तुम्ही अडकत तर नाहीत ना ?

एमपीसी न्यूज – कुठल्याही घातपाताशिवाय, चार भिंतींच्या आत बसून सराईतपणे केली जाणारी सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. एक प्रकार समाजात रूढ होत नाही तोच गुन्हेगारांकडून दुसरा प्रकार वापरला जातो. नागरिकांच्या भावनांशी, अशिक्षितपणाशी, हतबलतेशी खेळून हे गुन्हे केले जात आहेत. यासाठी गुन्हेगारांइतकेच मध्यस्थी कंपन्या देखील जबाबदार आहेत. सध्या ओएलएक्सच्या माध्यमातून आर्मी, एअरफोर्स, नेव्हीच्या जवानांचे फोटो आयडी वापरून वाहनांची विक्री केली जाते. प्रत्यक्षात वाहन विक्री न करता केवळ आर्थिक व्यवहारापुरता मध्यस्थी कंपन्यांचा वापर करून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. या नवीन गुन्हेगारीच्या जाळ्यात आपण अडकत नाहीत ना ? याची खात्री करा आणि अशा व्यक्तींपासून सावध रहा.

कॅंटोन्मेंट बोर्ड आणि मिलिटरी स्टेशनमध्ये, नाविक दलांवर लाखो सैनिक काम करतात. वेळोवेळी त्यांची प्रशासकीय कारणास्तव देशभरात कुठेही बदली होते. एखादा सैनिक जम्मू-काश्मीरवरून केरळ, तामिळनाडूला जातो. पश्चिम बंगालचा सैनिक मध्य-प्रदेशात येतो. अशा अनेक बदल्या होत असतात. नेमका याचा उपयोग करून काही विघातक मंडळींनी ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा शोधला. ओएलएक्स ही जगभरातील 45 देशांमध्ये चालणारी ऑनलाईन पद्धतीने जुन्या वस्तु खरेदी-विक्री करण्याची वेबसाईट आहे. फसवणूक करणारे या साईटचा सर्वाधिक वापर करतात.

एखाद्या सैनिकाचा फोटो गुगलवरून डाउनलोड करायचा. सैन्य दलाचे बनावट ओळखपत्र तयार करायचे. कुठलातरी वाहनाचा फोटो गुगलवरून डाउनलोड करायचा आणि ती माहिती ओएलएक्सवर टाकायची. 80 हजार रुपयांची दुचाकी 40 हजारात विकायची असल्याचे सांगितले जाते. एवढी कमी किंमत कशी काय ? असा प्रश्न समोरच्या ग्राहकाने विचारल्यास, ‘मी सैन्य दलात आहे. माझी या शहरातून दुस-या लांबच्या शहरात बदली झाली आहे. तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हायचे आहे. त्यामुळे दुचाकी घेऊन जाणं शक्य नाही. म्हणून ही दुचाकी मिळेल त्या किमतीला विकायची आहे’ असे कारण सांगितले जाते.

सैन्य दलातील जवानाकडून आपण गाडी घेऊन आपण एक प्रकारे त्याला मदत करत आहोत, असे फसवणूक करणा-याकडून ग्राहकांना पटवून दिले जाते. त्याला गाडी विकण्याची अतिशय घाई आहे, असे जाणवून ग्राहकाला गाडी खरेदी करण्यास तयार केले जाते. ग्राहक तयार झाला की, त्याच्याकडून ऑनलाईन माध्यमातून पैसे घेतले जातात. सैन्य दलामध्ये कोणतेही पार्सल पाठवायचे असल्यास त्याचे अगोदर पैसे भरावे लागतात, असा नियम आहे. याचाही फसवणूक करणारे पुरेपूर फायदा घेतात. मी गाडी कुरियर कंपनीच्या माध्यमातून पाठवली आहे. गाडी विमानतळावर आली आहे. तिथून सोडवण्यासाठी पुन्हा 10-20 हजारांना ग्राहकांना गंडवले जाते.

पिंपरी-चिंचवड शहरातील असे फसलेले काही ग्राहक पुणे विमानतळावर अक्षरशः मुक्काम ठोकून आले. मात्र, त्यांना गाडी मिळाली नाही. शेवटी स्वतःची फसवणूक झाल्याचे समजताच, त्यांनी घराऐवजी पोलीस ठाण्याचा रस्ता पकडल्यामच्या घटना शहरात घडल्या आहेत. एका ग्राहकाला असाच दुचाकी विकण्याच्या बहाण्याने गंडा घातला. आरोपीने त्यांच्याकडून गाडीची ठरलेली रक्कम घेतली. त्यानंतर ग्राहकाला विमानतळावर गाडी घेण्यासाठी पाठवले. ग्राहक विमानतळावर गेला. बराच वेळ वाट पाहिली पण गाडीचा पत्ता मिळाला नाही.

ग्राहकाने आरोपीला फोन केला असता ‘गाडी विमानतळाच्या स्टोअररूममध्ये आली आहे. तिथून बाहेर काढण्यासाठी निमानुसार पैसे द्यावे लागतात, असे सांगून पुन्हा 10 हजार रुपये बँक खात्यावर ऑनलाईन टाकण्यास सांगितले. ग्राहकाने नाईलाजाने पैसे खात्यावर जमा केले. दिवसभर थांबलेल्या ग्राहकाने संपूर्ण रात्र विमानतळावर गाडीची वाट पाहून काढली. पण त्याला गाडी मिळाली नाही. शेवटी त्या ग्राहकाने गाडी न मिळाल्याने निराश होऊन घरी न जाता थेट पोलीस ठाणे गाठले. अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

सैन्य दलाचे आयडी वापरून फसवणूक केल्यास फसणा-या नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. ही बाब लक्षात येताच ओएलएक्सच्या माध्यमातून फसवणूक करणा-यांनी आता अशा पद्धतीने कार विक्री सुरु केली आहे. हजारोंचे आकडे पार करुन हे आरोपी यामुळे लाखोंचे गंडे घालत आहेत. नागरिकांचे सैनिकांप्रती असलेले आपुलकी आणि देशप्रेम लक्षात घेऊन हे प्रकार होत आहेत. नागरिकांनी वेळीच सावध व्हायला हवे.

ओएलक्स सारख्या मध्यस्थी कंपन्या त्यांच्या साईटवर विक्रीसाठी अपलोड होणा-या वस्तूंची शहानिशा करत नाहीत. त्याबाबत त्यांची काहीही यंत्रणा नाही. कोणीही कुठलीही वस्तू विक्रीसाठी साईटवर अपलोड करतो. त्यामध्ये बनावटपणा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे चुकीच्या हेतूने साईटचा वापर करणा-या नागरिकांसोबत अपलोड करण्यासाठी सूट देणा-या ओएलएक्स सारख्या कंपन्यांवर देखील कारवाई करायला हवी. खूप विश्वास दाखवून नागरिक वेबसाईटवर दिसणा-या वस्तूंची खरेदी करतात. त्यासाठी आगाऊ पैसेही भरतात. पण त्यांना वस्तू मिळण्याऐवजी कधी धोंडे, कधी विटा, कधी रद्दी तर कधी कापडाचा गुंडाळा मिळतो. अनेक वेळा हे काहीच न मिळता केवळ निराशा पदरी पडते.

पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, “ऑएलएक्स सारख्या वेबसाईटच्या माध्यमातून वस्तू, दुचाकी विकण्याच्या बहाण्याने फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या सैन्य दलातील जवानांचे फोटो आयडी वापरून हे प्रकार केले जात आहेत. नागरिकांनी अशा गोष्टींना बळी न पडता जागरूक राहून वस्तूंची खरेदी करावी. अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.