Pimpri: मागील स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव स्थायी समितीने केला रद्द

आरक्षित जागेपोटी मालमत्ताधारकांना 17 कोटी मोबदला देण्याचा होता ठराव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख रूपये मोबदला देण्याचा 12 दिवसांपूर्वी मागील स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव नव्या स्थायी समितीने पहिल्याच बैठकीत रद्द केला आहे. संतोष लोंढे यांच्या अध्यतेखाली झालेल्या पहिल्याच सभेत ठराव रद्द केल्याने  भाजपमधील या ठराव संमत, ठराव रद्दमागील अर्थकारणाची जोरदार चर्चा सुरु आहे.
 शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्याने किंवा आरक्षणाने बाधीत जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबत 19 ऑगस्ट 2019 रोजी खासगी वाटाघाटी समितीची बैठक पार पडली. या सभेत संबंधित मालमत्ता धारकांसमवेत सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यानुसार, खासगी वाटाघाटी समितीने मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकास देण्यास मंजुरी दिली.

पिंपळे – सौदागर, रहाटणी, वाकड, सांगवी, चिखली, मोशी, दापोडी येथील एकूण 17 मालमत्ताधारकांना 16 कोटी 80 लाख रूपये मोबदला देण्याचा प्रस्ताव 28 फेब्रुवारी रोजीच्या स्थायी समितीने संमत केला. स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या सभेत या प्रस्तावाला आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मडीगेरी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपुष्टात आला. स्थायी समितीवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच स्थायी समिती अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची निवड झाली.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 11) पहिलीच सभा पार पडली. मात्र, या पहिल्याच सभेत आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना 16 कोटी 80 लाख रूपये मोबदला देण्याचा विषय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील या बेबनावाची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.