Pimpri News: भाजपच्या स्थायी समितीने मान्यता दिलेल्या अर्थसंकल्पावर प्रशासक आयुक्त उठविणार ‘मोहोर’

एमपीसी न्यूज – आकसाची माझी भावना नाही.  स्थायी समितीनेही चांगल्या हेतूने महापालिकेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला उपसूचना दिल्या आहेत. त्या उपसूचना ग्राह्य, अग्राह्य केल्या जातील. त्यातील ग्राह्य उपसूचना स्वीकारल्या जातील. प्रशासकाला महासभेचे अधिकार असून प्रशासक म्हणून मी स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाला मान्यता देईल. 1 एप्रिल पासून स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू होईल अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महापालिकेचा सन 2022-23 या आर्थिक वर्षांचा मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह  6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने 18 फेब्रुवारी 2022 रोजी स्थायी समिती सभेला सादर केला. त्यानंतर स्थायी समितीने 23 फेब्रुवारी 2022 रोजी वाढ घटीच्या 885 कोटी 66 लाख रुपयांच्या उपसूचना देत आणि विविध नवीन कामे सूचवित अर्थसंकल्पाला मान्यता दिली. अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे शिफारस केली होती. परंतु, 13 मार्चपर्यंत महापालिकेची विशेष सभा घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा होऊन महासभेची मंजुरी मिळणे आवश्यक होते. परंतु, कालावधी कमी राहिल्याने महासभा घेण्यात आली नाही. रविवारी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली. त्यामुळे भाजपच्या स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू होणार की आयुक्तांच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाणार याबाबत उत्स्कुता होती.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”उपसूचना द्यायचा नियम असतो. अनेकदा नियमाला धरुन उपसूचना कमी असतात. स्थायी समितीने अर्थसंकल्पाला दिलेल्या उपसूचना ग्राह्य की अग्राह्य याची तपासणी केली केली जाईल. महत्वाच्या उपसूचना असतील. तर, त्या स्वीकारल्या जातील. माझी आकसाची भूमिका नाही. स्थायी समितीनेही चांगल्या हेतूने चांगल्या हेतूनेच उपसूचना दिल्या असतील. त्यामुळे स्थायी समितीने मंजुर केलेल्या अर्थसंकल्पाला महासभेची मान्यता म्हणजेच प्रशासक म्हणून मी मान्यता देईल. एक एप्रिलपासून प्रशासकाने मान्यता दिलेल्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली जाईल”.

स्थायी समितीने अर्थसंकल्पात ही नवीन कामे सूचविली आहेत!

पदाधिकारी व अधिका-यांसाठी ‘ई – वाहन’ खरेदी, पद्मभूषण माजी खासदार राहुल बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकुर्डीमध्ये स्मारक उभारणे, बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांवर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारणे, भोसरीतील सहल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय ; कै. अंकुशराव लांडगे सभागृह मागील जागेत एसटीपी प्रकल्प ; उर्वरीत मोकळ्या जागेत महावितरण कंपनीसाठी स्विचिंग स्टेशन उभे करण्यास जागा देणे ; भोसरीतील नविन रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवून नागरिकांना चोविस तास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा देणे, पुणे – मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारावे अशी कामे स्थायी समितीने सुचविली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.