Pimpri News: ‘त्या’ मुलांनी अनुभवला पडद्यावर आपलाच ‘जीवनपट’!

एमपीसी न्यूज – नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट हा झोपडपट्टीतील मुलांवर आधारित असून गुन्हेगारीकडे वळलेली मुले फुटबॉल खेळत-खेळत कशी सुधारली हे या चित्रपटात दाखविले आहे. तशीच फुटबॉलची टीम तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील आणि पुण्यातील अशा 45 मुलांना आज (शनिवारी) ‘झुंड’ चित्रपट दाखविण्यात आला. या मुलांनी पडद्यावर आपलाच जीवनपट अनुभवला आहे. या मुलांमध्ये जिद्द निर्माण होऊन उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सामाजिक संस्थांनी मुलांना झुंड चित्रपट दाखविला.

झोपड्पट्टी भागातील वातावरणामुळे त्या परिसरातील मुले गुन्हेगारीकडे वळण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी विशेष बालपथक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या प्रयत्नातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांच्यावतीने निगडी सेक्टर 22 येथील मुलांसाठी महापालिकेच्या मधुकर पवळे शाळेत स्पोर्ट्स ‘अॅक्टीव्हिटी’ सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत वेगवेगळे खेळ घेतले जातात. मुलांची फुटबॉलची टीम तयार झाली आहे. मुले अतिशय उत्तम फुटबॉल खेळत आहेत.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट हा झोपडपट्टीतील मुलांवर आधारित आहे. नागपूर येथील सेवानिवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देऊन फुटबॉलपट्टू बनविले आहे. झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे धडे दिले. त्यांच्या कार्यावर आधारित ‘झुंड’ चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. त्यांची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. गुन्हेगारीकडे वळलेली मुले फुटबॉल खेळत-खेळत कशी सुधारली हे चित्रपटात दाखविले आहे. त्या मुलांना फुटबॉलची आवड निर्माण केली.

पिंपरी बौध्दनगर, पत्राशेड, सेक्टर 22 येथील मुलांची फुटबॉलची टीम तयार झाली आहे. या 45 मुलांना झुंड चित्रपट दाखविण्यासाठी संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाऊंडेशन, अल्का फाऊंडेशनच्या अलका गुजनाळ, मिशन ऑफ स्पीस मेकिंगचे अनुप हिवाळे, अमोल कर्डेक, रिचर्ड स्तानिस्लाऊस, अमित क्षेत्री, एॅलिस लोबो, रितू पाटील, सुमित जगधाने यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील विमाननगर फिनिक्स मॉल मधील पीव्हीआर टॉकीजमध्ये मुलांना हा चित्रपट दाखविण्यात आला. स्लम सॉकरचे सीईओ डॉ. अभिजीत बारसे, विजय बारसे व बूक अ स्माईल यांनी तिकीटांचे प्रायोजक्तव स्वीकारले होते. पिंपरी-चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुबराव गवारे यांनीही सहकार्य केले.

फुटबॉल टीममधील आठ वर्षाचा जॉन चित्रपट बघून रडला. अतिशय चांगला चित्रपट असून हा चित्रपट पाहून मोठी प्रेरणा मिळाली असल्याचे त्याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.