Pimpri News : शहरातील 1 लाख 87 हजार 970 बालकांना दिले ‘दो घुंट जिंदगी के’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड मनपा परिसरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत 1 लाख 87 हजार 970 बालकांना आज पोलिओ लस देण्यात आली. मनपा परिसरात 1,019 लसीकरण केंद्रांमार्फत 8 प्रभारी वैद्यकीय अधिकारी रुग्णालय व 55 वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली 215 पर्यवेक्षक, 3,042 लसीकरण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे हे 26 वे वर्ष असून या कालावधीत मनपा क्षेत्रात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही.

शहरातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयातून करण्यात आला. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरकुमार हांडे, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. श्रद्धा कोकरे, डॉ. तुषार जाधव, डॉ. अल्वी नासीर, डॉ. कुंदन पाटील, डॉ. गोविंदा नरके, कार्यक्रम अधिकारी डॉ. चैताली इंगळे, सांगवी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, शोभा ढोले आदि उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 1,019 लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली. त्यापैकी सर्व मनपा रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 908 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्र, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 38 ट्रान्झीट लसीकरण केंद्र, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 73 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली होती.

पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी टाटा मोटर्स स्वयंसेवक, रोटरी क्लबचे अध्यक्ष व स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्ल्यू, एएनएम, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर विविध स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांना आज ( रविवार, दि.31) रोजी पल्स पोलिओ लसीकरण झाले नाही, त्यांना घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापौर व आयुक्त यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.