Pimpri News: ‘बजाज’कडून महापालिकेला 1 लाख ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस

एमपीसी न्यूज – बजाज ग्रुपतर्फे शहर कोरोनामुक्त करण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेला शहरवासीयांकरिता कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसींचे 1 लाख डोस दिले आहेत. त्यामुळे महापालिकेकडे लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

बजाज फायनान्स लिमिटेड कंपनी आणि बजाज ऑटो लिमिटेडकडून दिलेल्या ‘कोविशिल्ड’ लशींचे आजपासून लसीकरण सुरु झाले. महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थित त्याचे जिजामाता रुग्णालयात उद्घाटन करण्यात आले. उपमहापौर हिराबाई घुले, सभागृह नेते नामदेव ढाके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, लसीकरण प्रमुख डॉ. वर्षा डांगे आणि बजाज ग्रुपचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. शहरातील 18 लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. आजपर्यंत 18 लाख 87 हजार 157 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यात सुमारे 12 लाख नागरिकांचा पहिला डोस झाला. तर, सुमारे सहा लाख नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी या लसींचा फायदा होणार आहे.

लस मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. ज्यांचे पहिले डोस राहिले आहेत. त्यांनी लसीकरण करुन घ्यावे. पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा. लसीकरणासाठी टीम वाढविल्या आहेत. गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्यांमध्ये लसीकरण सुरु केले आहे. लस घेण्यासाठी टोकन घेण्याची गरज लागत नाही. रांगेत थांबून थेट लस मिळत आहे. लसींचा मोठा फायदा होत आहे. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.