Pimpri news: ‘वायसीएम’मधील मानधनावरील डॉक्टरांच्या वेतनात 10 हजारांची वाढ

65 हजारापासून 85 हजार रूपयापंर्यत मिळणार वेतन

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात मानधनावर कार्यरत असणा-या वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच विविध कन्सल्टंट डॉक्टरांच्या मानधनात 10 हजार रूपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या डॉक्टरांना दरमहा 65 हजारापासून 85 हजार रूपयापर्यंत मानधन मिळणार आहे.

शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा 60 हजारपार गेला आहे. दररोज कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध कोरोना वॉर्ड आणि कोरोना केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे कोरोना रूग्णांवरील उपचाराकरिता समर्पित करण्यात आले आहे. वायसीएम रूग्णालयांमधील रूग्णांचा वाढता व्याप लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने कालावधीकरिता मानधनावर वेळोवेळी वर्ग एक ते वर्ग चारच्या श्रेणीतील विविध कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येते.

या रूग्णालयात वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, पीजीजीआर आणि विविध कन्सल्टंट डॉक्टरांची पदे मानधनावर भरण्यात येतात.

त्यानुसार, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, पॅथालॉजिस्ट, रेडीओलॉजिस्ट, सर्जन, कॅन्सर सर्जन, न्युरो सर्जन, बालरोग सर्जन, न्युरो फिजिशियन, फिजीशियन, अस्थीरोग तज्ञ, उरोरोग तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, पीजीजीआर अशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांना कोरोना कालावधीपुरते दरमहा 10 हजार रूपये मानधनात वाढ देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. या डॉक्टरांना सध्या 55 हजारापासून 75 हजार रूपयांपर्यंत दरमहा मानधन मिळते.

10 हजार रूपये मानधनात वाढ केल्याने आता या डॉक्टरांना दरमहा 65 हजारापासून 85 हजारापर्यंत मानधन मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.