Pimpri News: पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा, तरीही पाणीकपात कायम राहणार- आयुक्त हर्डीकर

यंदा जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे होती. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली.

एमपीसी न्यूज – तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरल्याने दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे. 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड सुरु असलेली पाणी कपात यापुढेही कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडकर मागील नऊ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे.

यंदा जुलैपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे होती. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला. आजमितीला धरणात 99.14 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे रविवार सकाळपासून 2200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण 100 टक्के भरल्याने आता दररोज पाणीपुरवठा होईल. नऊ महिन्यानंतर पाणी कपातीचे संकट संपेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. पण, तूर्तास नागरिकांची निराशा झाली आहे. वाढीव पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी अतिरिक्त पाणी लागणार आहे. 30 ते 40 एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत पाणी पुरवठा आहे तसाच राहणार आहे”.

पवना धरणातील पाण्याची आजची आकडेवारी!
– गेल्या 24 तासांत झालेला पाऊस 22 मिली मीटर
– 1 जूनपासून झालेला पाऊस 1565 मिली मीटर
– गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 3204 मिली मीटर
– धरणातील सध्याचा पाणीसाठा 99.14% टक्के
– गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 100% टक्के
– गेल्या 24 तासांत पाणीसाठ्यात झालेली वाढ 1.14% टक्के
– 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 63.85% टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.