Pimpri News: काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष पदासाठी 13 महिला इच्छुक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदासाठी 13 महिला इच्छूक आहेत. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महिलांच्या मुलाखती घेतल्या. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच यातील एका महिलेचे नाव शहराध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणा-या महिलांच्या मुलाखती आज (शनिवारी) पार पडल्या. शहराध्यक्ष कैलास कदम, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उज्वला सावळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच प्रा. शैलजा सांगळे, भारती घाग आदी उपस्थित होते.

यावेळी संध्या सव्वालाखे आणि संगीता तिवारी यांनी महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणा-या महिलांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये नंदा तुळसे, छाया देसले, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया मलशेट्टी, सुप्रिया पोहरे, स्वाती शिंदे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, शितल कोतवाल, तुलसी नांगरे, शिवानी भाट, प्रतिभा कांबळे यांनी मुलाखती दिल्या. इच्छुक महिलांना पक्ष संघटना वाढीबाबत आणि आगामी निवडणूकांसाठी त्यांचे व्हिजन, नियोजन, महिलांचा राजकीय क्षेत्रातील सहभाग, महिला सबलीकरण, सामाजिक, आर्थिक, सक्षमीकरण या विषयी वैयक्तिक मुलाखती घेऊन प्रश्न विचारले आणि त्यांची सव्वालाखे व तिवारी यांनी मते जाणून घेतली.

”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणूका काँग्रेस आत्मविश्वासाने लढणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाव्दारे नागरीकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच चांद्यापासून बांध्यापर्यंत काँग्रेसची महिला संघटना बांधण्याचे काम सक्षमपणे सुरु आहे. महिला शहराध्यक्षपदासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनिय आहे”, असे संध्या सव्वालाखे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.