Pimpri News: दिव्यांग नागरिकांच्या 2404 बस पासांसाठी ‘पीएमपी’ला 2 कोटी 20 लाख

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ठिकाणच्या दिव्यांग, कर्णबधीर व 100 टक्के अंध नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवास करण्याचा पीएमपीएमएलचा मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा एकूण 2404 पासेस करीता सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये पीएमपीएमएलला देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे 18 कोटी 68 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. दिव्यांग विकासाच्या योजना क्र. 13 अन्वये सुरू करण्यास तसेच विद्यार्थाबरोबरच शहरातील 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ठिकाणच्या दिव्यांग, कर्णबधीर व 100 टक्के अंध नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवास करण्याचा पीएमपीचा मोफत पास देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकूण 2404 पासेस करीता सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिका हद्दीतील एचआयव्ही एडस् बाधीत व्यक्तींना देखील पीएमपीचा मोफत बसपास देण्यास मान्यता देण्यात आली.

मासुळकर कॉलनी ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 22 लाख, तर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे अद्यावत पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी 29 लाख, किवळे गावठाण भागातील रस्त्याचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी 28 लाख, प्रभाग क्रमांक 5 मधील ड्रेनेज लाईन आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 30 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्रमांक 21 मधील नव्याने ताब्यात आलेले रस्ते एमपीएम पध्दतीने विकसीत करण्यासाठी 30 लाख, प्रभाग क्र. 50 मध्ये प्रसुनधाम शेजारी 18 मीटर डीपी रस्त्यावर थेरगाव चिंचवड दरम्यानचा पुल बांधण्यासाठी 62 लाख तसेच मासुळकर कॉलनी, यशवंतनगर, उद्यमनगर परिसरातील महापालिका शाळा इमारतींच्या दुरुस्तींची कामे करण्यासाठी 51 लाख खर्च केले जाणार आहेत. याखर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.