Pimpri News: घरगुती गणपती 2 फूट तर सार्वजनिक मंडळांच्या मुर्तींना 4 फूट उंचीची मर्यादा, महापालिकेच्या सूचना

मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. शक्य असल्यास मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलण्यात यावे.

एमपीसी न्यूज – सर्वांचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आगमन पाच दिवसांवर आले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. सजावटदेखील जास्त आकर्षक ठेवू नये, असे नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट तर घरगुती गणपती 2 फूट उंचीच्या मर्यादेतील असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. याद्वारे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांना सूचना करण्यात आल्या आहेत.

यावर्षी शक्यतो नागरिकांनी पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे. शक्य असल्यास मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलण्यात यावे.

घरी विसर्जनाची सोय नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जन किंवा पुढील वर्षी अनंत चतुर्दशीला विसर्जन करावे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळून कोरोना साथीपासून रक्षण होईल.

गणेश मंडळांनी गणेशोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भात नियमांचे आणि तरतुदींचे पालन करावे.

गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांकडून कोरोनाच्या बाबतीतील सर्व नियम पाळले जात आहे की नाही याकडे लक्ष द्यावे. श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नये. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. विसर्जन मिरवणूका एकत्रित काढण्यात येऊ नयेत, असे आवाहन पालिकेतर्फे सार्वजनिक मंडळांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.