Pimpri news: महापालिका कर्मचाऱ्यांच्या ‘विम्या’साठी पाणीपुरवठ्याची 21 कोटींची तरतूद वळविली

महापालिका महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी लागू केलेल्या विमा योजनेसाठी पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील तरतूद वळविण्यात आली आहे. त्यामधून 21 कोटी विमा योजनेसाठी वर्ग केले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

जानेवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

महापालिका सेवेतील, तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. ती बंद करुन आता वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. दि न्यु इंडिया एशोरंन्स कंपनी लि. यांना त्याचे काम देण्यात आले आहे. त्यांना प्रिमियमचा 25 टक्के म्हणजेच 6 कोटी 96 लाख 19 हजार 652 रुपयांचा पहिला हप्ता तत्काळ देण्यात येणार आहे. तर, विम्याचा दुसरा हप्ता 31 जानेवारी 2021 रोजी दिला जाणार आहे.

पण, धन्वंतरी स्वास्थ योजना विभागाच्या सन 2020-21 च्या अंदाजपत्रकात विमा निधी लेखाशिर्षावर 7 कोटी तरतूद शिल्लक आहे. दि न्यु इंडिया एशोरंन्स कंपनीला वैद्यकीय विम्यासाठी 4 जानेवारी 2021 रोजी कामाचा आदेश दिला आहे.

विमा कंपनीस 27 कोटी 84 लाख 78 हजार 608 रुपये देय आहे. तथापि, तरतूद फक्त 7 कोटी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विशेष योजना निधीतील तरतुदींमधून 21 कोटी रुपये वर्ग करणे गरजेचे आहे.

पाणी पुरवठा विशेष योजनेतील आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे उभारायच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी देहू येथून नदीतून जलउपसा करुन पाईपलाईनद्वारे पाणी आणणे. इतर तद्दअनुषंगिक कामे करणे, या कामांतर्गत देहू (बोडकेवाडी बंधारा) येथून जलशुद्धीकरण केंद्र चिखलीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी 22 कोटींची तरतूद आहे. त्यातील 5 कोटी तरतूद विम्यासाठी वळविण्यात येणार आहे.

चिखली व मोशी येथे पाण्याची मुख्य नलिका टाकणे, 3 उंच पाण्याच्या टाक्या उभारणे आणि कार्यान्वित करणे यासाठी असलेल्या 7 कोटींमधून 6 कोटी रुपये विम्यासाठी वळविण्यात येणार आहे.

वाकड थेरगाव सेक्टर 7,10 व भोसरीत पाण्याची मुख्य नलिका टाकणे, 7 उंच पाण्याच्या टाक्या उभारणे, 1 पंप हाऊस उभारणे आणि कार्यान्वित करणे यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यातील 6 कोटी रुपये विम्यासाठी विळविण्यात येणार आहे.

किवळेतील सेक्टर 96, पुनावळे, ताथवडेत पाण्याची मुख्य नलिका, 8 उंच पाण्याच्या टाक्या उभारणे, 2 शुद्ध पाण्याच्या टाक्या व पंप हाऊस उभारणे, कार्यान्वित करणे यासाठी 7 कोटींची तरतूद आहे. त्यातील 4 कोटी अशी एकूण 21 कोटी रुपये तरतूद विम्यासाठी वळविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.