Pimpri News: महापालिकेतील 26 नगरसेवकांची कोरोनावर यशस्वी मात; ‘हे’ आहेत कोविड योद्धे नगरसेवक

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या विदारक परिस्थितीतही आपला जीव धोक्यात घालून जनहितासाठी सेवा देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय 29 नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बाधित झालेल्या 26 नगरसेवकांनी त्यावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्त नगरसेवक पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. तर, महापालिकेतील विद्यमान तीन नगरसेवक आणि 6 माजी नगरसेवकांना कोरोनाने कायमचेच गाठले. त्यांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत 10 मार्च रोजी सापडला होता. एकाच दिवशी तीन रुग्ण सापडले होते. तीन रुग्णांची संख्या वाढताचा वाढता आता 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

कोरोनाच्या दहशतीमुळे सारे पिंपरी – चिंचवडकर चिंताक्रांत झाले आहेत. महापालिकेच्या सर्वच परिसरात कोरोनाच्या विषाणुने आपले हातपाय पसरले आहेत. हा घातक विषाणु दररोज शेकडो नव्या लोकांमध्ये संक्रमीत होऊन आपला विळखा आणखी घट्ट करत आहे.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या कालावधीत परप्रांतिय मजूर वर्ग मोठ्या संख्येने शहरात अडकून पडला होता. एकीकडे सर्व व्यवहार बंद असताना या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी जीवाची पर्वा न करता लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात धावून आले.

महापालिकेच्या अनेक विद्यमान नगरसेवकांनी जनसंपर्क कार्यालयातून अन्नधान्य वाटप, भाजीपाला वाटपाचे काम केले. सुरुवातीला औषध फवारणी, रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे कामसुद्धा केले.

रुग्णालयास व्हेंटिलेटरपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत वैद्यकीय मदत केली. हे करत असताना पालिकेच्या तब्बल 29 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 26 नगरसेवकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, दुर्दैवाने तीन नगरसेवकांना जीव गमवावा लागला.

‘हे’ आहेत 26 कोविड योद्धे नगरसेवक!

कोरोनाकाळात मदतीचे काम करत असताना सर्वपक्षिय नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला. भाजपच्या चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, कमल घोलप, सीमा सावळे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, निर्मला कुटे, साधना मळेकर, भीमाबाई फुगे, स्वीनल म्हेत्रे, नीता पाडाळे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, विलास मडिगेरी, बाबू नायर, तुषार कामटे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, शशिकांत कदम, शिवसेनेचे राहुल कलाटे, निलेश बारणे, राष्ट्रवादीचे नाना काटे, शीतल काटे, डब्बू आसवानी, अनुराधा गोफने यांना कोरोनाची बाधा झाली होती.

या सर्व नगरसेवकांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. त्यातून बरे होत आता ते पुन्हा जनसेवेत सक्रीय झाले आहेत. नगरसेवक कामठे यांनी प्लाझ्मा दान केले आहे.

तीन विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांना कोरोनाने कायमचेच गाठले

लॉकडाऊन काळात गोरगरिब जनतेला सुमारे 15 लाख रूपयांचे अन्नधान्य वाटप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील नगरसेवक दत्तात्रय साने यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाने त्यांचा बळी घेतला.

त्यानंतर राष्ट्रवादीचेच आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांनाही कोरोनाशी सामना करताना जीव गमवावा लागला. भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचाही कोरानामुळे मृत्यु ओढावला.

तर, जनसेवा करताना लोकांच्या संपर्कात आल्याने माजी नगरसेवक रंगनाथ फुगे, साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड, सुलोचना बडे, हनुमंत खोमणे यांचे देहावसान झाले. जनतेत मिसळून काम करणा-या आजी – माजी नगरसेवकांचा कोरोनाने बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.