Pimpri News: पालिकेला मालमत्ता करातून पाच महिन्यांत 264 कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2021-22 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात मालमत्ताकरातून 263.96 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा 60 कोटींचे अधिकचे उत्पन्न मिळाले असल्याचे कर आकारणी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात कर आकारणी विभागाला 1 हजार 82 कोटी रुपयांचे उदिष्ट आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला 5 लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. 16 विभागीय कार्यालयांमार्फत कर वसुली केली जाते. एलबीटी बंद झाल्यापासून महापालिका मालमत्ता करांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. उत्पन्नाचा कर आकारणी विभाग मुख्य स्त्रोत आहे.

चालू आर्थिक वर्षात कर आकारणी विभागाला 1 हजार 82 कोटी रुपयांचे उदिष्ट आहे. विभागाने कर वसुलीवर भर दिला. एप्रिल महिन्यात 40 कोटी, मे मध्ये 49.57 कोटी, जून 88.40 कोटी, जुलै 57.92 कोटी आणि ऑगस्ट महिन्यात 28.07 कोटी रुपये असे एकूण 263.96 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागीलवर्षी ऑगस्टअखेर 204.13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात 60 कोटींचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेने मालमत्ताकर लागू नसलेल्या मालमत्ता शोधल्या. वाढीव, नवीन मालमत्तांना कर आकारणी करण्यात आल्याचे झगडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.