Pimpri News: भाजपमधील 27 नगरसेवक असंतुष्ट ! चार वर्षात एकही मोठे पद नाही

नगरसेवकांमध्ये अस्वस्थता ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेला चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. भाजपने पाच वर्षात सर्वांना पद देणार असल्याचे जाहीर केले खरे प्रत्यक्षात मात्र चार वर्षात तब्बल 27 नगरसेवकांना प्रभाग अध्यक्ष, विषय समिती सभापती असे एकही मोठे पद मिळालेले नाही. त्यामुळे या नगरसेवकांमध्ये नाराजी, अस्वस्थता दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपची निविर्विदा सत्ता आली. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक निवडून आले. पाच अपक्षांनीही भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे पाशवी बहुमतासह पालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले.

आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे शहराचे कारभारी झाले. पालिकेतील कोणतेही पद विरोधकांना मिळणार नाही याची तजवीज केली. त्यादृष्टीने प्रभाग रचनाही केली. त्यानुसार सर्वच प्रभाग भाजपच्या हाती ठेवले.

पक्षाने पाच वर्षात सर्व नगरसेवकांना एक पद देण्याचे धोरण ठरविले होते. पहिल्या अडीच वर्षात नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौर तर शैलजा मोरे, सचिन चिंचवडे यांना उपमहापौरपदी संधी दिली. सीमा सावळे यांना महत्वाचे स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले.

त्याचवेळी प्रत्येक सदस्याला स्थायीत संधी देण्याचे सांगत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्थायीतील सर्व सदस्यांचे राजीनामे घेतले.

पण, दुस-या वर्षी त्यात बदल केला. स्थायीत एक वर्षपूर्ण झाल्यानंतर विलास मडिगेरी यांना अध्यक्षपद मिळाले. ममता गायकवाड यांनीही अध्यक्षपद भूषविले असून सध्या संतोष लोंढे अध्यक्ष आहेत. पालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार निवडणुकीला केवळ 13 महिन्यांचा कालावाधी शिल्लक आहे.

चार वर्षांत भाजपच्या तब्बल 27 नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. नावासमोर लावण्यासाठी पालिकेतील कोणतेच महत्वाचे पद त्यांना मिळाले नाही. विषय समिती सभापती आणि प्रभाग अध्यक्षपद मिळाले नाही.

विषय समिती सभापतींची मागील महिन्यात निवड झाली. त्यांचा एक वर्षाचा कालावधी असतो. पुढील वर्षी निवडणुकीच्या तोंडावर सभापतींच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर आहे.

त्यामुळे या नगरसेवकांना सभापतीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. आता चिंचवड मतदारसंघातील उषा ढोरे महापौर, तर पिंपरीतील केशव घोळवे उपमहापौर आहेत. महापौर बदलाची पाठीमागे चर्चा होती. परंतु, ती चर्चाही आता थंड झाली आहे.

चार वर्षानंतरही ‘हे’ नगरसेवक पदाविना !

सलग तिसऱ्यावेळी निवडून आलेल्या जयश्री गावडे, दुसऱ्यांदा निवडून आलेले शीतल शिंदे, शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, चंद्रकांत नखाते, संगीता भोंडवे, माया बारणे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, आरती चोंधे, पालिकेत भाजपचे खाते उघडणारे आणि बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, पहिल्यावेळी निवडून आलेले संदीप वाघेरे, तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, वसंत बोराटे, शैलेश मोरे, प्रियंका बारसे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, सविता खुळे, माधवी राजापूरे, सारिका बो-हाडे, सारिका लांडगे, कोमल मेवाणी, संदीप कस्पटे, राजेंद्र गावडे, संतोष कांबळे यांना विषय समितीचे सभापतीपद आणि प्रभाग अध्यक्ष यापैकी एकही महत्वाचे पद मिळाले नाही.

त्यांच्या नावापुढे चार वर्षात कोणतेही पद लावता आले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी विषय समिती आणि प्रभाग अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आहे त्याच प्रभाग अध्यक्ष, विषय समिती सभापतींना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील वर्षात पद मिळण्याची संधी धूसर आहे.

येणा-या वर्षभरात सर्वांना पद देण्याचा प्रयत्न – ढाके

‘महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना पदे मिळतील. निवडणुकीला आणखी एक वर्ष बाकी आहे. पुढील वर्ष प्रभाग अध्यक्ष, विषय समिती सभापतींची निवडणूक होईल. येणा-या वर्षभरात सर्व नगरसेवकांना पद देण्याचा प्रयत्न केला जाईल असे’ भाजप गटनेते तथा सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.