Pimpri News: कोरोना उपाययोजनेसाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला 41.50 लाखांचा निधी; भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती दिले?

संजोग वाघेरे व प्रशांत शितोळे यांचा सवाल ; कोरोनाच्या निधीवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरसाठी पालिकेकडून त्यांचा हिस्सा घेतला आहे. तसेच स्थानिक प्रशासनावर जबाबदारी ढकलली जात आहे. शहराला अर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर कोरोना उपाययोजनेच्या मदत निधीवरुन स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्य सरकारने 1700 कोटी दिल्याचा दावा राष्ट्रवादीने केल्यानंतर त्याला उत्तर देताना राज्य सरकारकडून कोरोनासाठी पालिकेला सतराशे नव्हे फक्त दीड कोटी मिळाल्याचे सांगत महापौरांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला होता.

त्यावर कोरोना उपयोजनेकरिता ‘राष्ट्रवादी’च्या एका आमदाराने शहरासाठी 41.50 लाखांचा निधी दिला आहे. तर, भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती निधी दिला ते जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भाजपाला दिले आहे.

याबाबत राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने 33% पेक्षा जास्त  1700 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र, त्यातील बहुतांश कामे केवळ एका विधानसभा मतदारसंघातील असल्याने पडद्यामागच्या सुत्रधाराचा तीळपापड झाला आहे.

त्यामुळे त्यांनी महापौर व पक्षनेत्यांना पुढे केले. जे दुसऱ्याच्या आकलेने चालतात त्यांनी आम्ही काय केले याची अक्कल शिकवू नये.

शहरातील एकमेव राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांनी कोविड 19 काळात शहरासाठी 41. 50 लाख दिले, एका खाजगी बँकेच्या सीएसआरमधून 40 लाख दिले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून 2 कोटी 25  लाख निधी दिला. तरी भाजपचे पदाधिकारी म्हणतात राज्य सरकारने दीड कोटी रुपये दिले.

उलट पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी भाजपला भरभरून दिले, महापालिकेची सत्ता दिली. त्या भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती निधी दिला हे जाहीर करावे. तसेच शहरातील एकाच मतदारसंघात १७०० कोटीचा निधी का नेला हेही जाहीर करावे.

भाजपने मोठ्या पदांवर विराजमान केलेल्या व प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या महापौर व पक्षनेते यांना आपल्याच महानगरपालिकेची माहिती नाही हे शहराचे दुर्भाग्य आहे.

आकड्यांचा खेळ करणाऱ्या भाजपने दुसऱ्याच्या अकलेचे तारे मोजण्यापेक्षा स्वतःचे ज्ञान तपासून पहावे असा, हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.