Pimpri News: निवारा केंद्राच्या देखभालीसाठी तीन वर्षाकरिता 48 लाखाचा खर्च

शहरातील बेघरांकरिता पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या दिनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत शहरातील बेघरांकरिता पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या निवारा केंद्राच्या देखभाल आणि व्यवस्थापनाचे कामकाज संत तुकारामनगर येथील रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेला तीन वर्षासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी 48 लाख रूपये खर्च होणार आहे.

केंद्र सरकारच्या दिनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत शहरातील बेघरांकरिता महापालिकेच्यावतीने पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईत निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या निवारा केंद्राची देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्वंयसेवी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

या संस्थेमार्फत शहरातील बेघरांचे निवारा व्यवस्थापन करण्याबरोबरच येथे राहणा-या व्यक्तींची काळजी घेतली जाणार आहे. तीन वर्षाखालील मुले-मुली यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

अंगणवाडी आणि शाळेत जाणारी मुले वेळेवर व नियमितपणे शाळेत जाण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे.

याशिवाय वृद्ध, रूग्ण यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, शहरातील बेघरांना निवा-यामध्ये आणणे, निवा-यातील व्यक्तींचे आधारकार्ड काढणे, विविध दाखले, प्रमाणपत्र काढणे, इतर योजनांबाबत संपर्क साधणे, सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, निवा-याची माहिती तयार करणे, दर महिन्याला प्रगती अहवाल देणे, निवा-याच्या दैनंदीन कामकाजाची देखरेख करणे, महिला अत्याचार प्रतिबंधक समितीशी संपर्क साधणे असे कामकाज करण्यात येणार आहे.

त्यानुसार, या कामकाजासाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. त्यामध्ये पिंपरीतील संत तुकारामनगर येथील रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेने प्रति वर्ष 16 लाख 19 हजार रूपये याप्रमाणे तीन वर्षे कालावधीसाठी सर्व करांसह 48 लाख 58 हजार रूपये असा लघुत्तम दर सादर केला आहे.

त्यानुसार, या संस्थेला निवारा केंद्राच्या देखभाल आणि व्यवस्थापनाचे कामकाज देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.