Pimpri News: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 50 हजार अर्ज

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत येथे महापालिका तीन हजार 664 घरांचा प्रकल्प राबवित आहे. यासाठी 49 हजार 163 नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत.

केंद्र सरकारने 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ अशी घोषणा 2014 मध्ये जाहीर केली. त्यानुसार पंतप्रधान आवास योजना जाहीर केली. त्याअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी गृहप्रकल्प योजना आखली. त्याअंतर्गत चऱ्होलीतील पठारे वस्ती, मोशीतील बोऱ्हाडेवाडी आणि रावेतमध्ये प्रकल्पाची उभारणी सुरू केली.

प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून ड्रॉ पद्धतीने सदनिका वितरीत केल्या जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. अर्जासोबत पाच हजार रुपये किंमतीचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा होता.

सदनिकेच्या मूळ किंमतीमध्ये पाच हजार रुपयांचा समावेश केला जाणार आहे. आजपर्यंत 49 हजार 163 नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ तीन हजार 664 नागरिकांनाच सदनिका मिळणार आहेत. म्हणजेच 45 हजार 499 नागरिकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे.

त्यांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे तब्बल 22 कोटी 74 लाख 95 हजार रुपये काही दिवसांसाठी महापालिकेकडे अडकून पडणार आहेत. ड्रॉमध्ये सदनिका न मिळाल्यास पाच हजार रुपये अर्जदारांना परत मिळणार आहेत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र सरकारकडून लाभार्थींना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी यासाठी अर्ज केले. चऱ्होलीतील प्रकल्पाच्या पार्किंगचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे.

बोऱ्हाडेवाडीतील दोन इमारतींचे आरसीसी झालेले आहे. रावेत येथील इमारतींचेही काम सुरू झालेले आहे.

चऱ्होलीत एक हजार 442 सदनिका आहेत. एका सदनिकेची किंमत नऊ लाख 19 हजार रुपये आहे. अडीच लाख रुपये अनुदानामुळे सदनिकेची किंमत केवळ सहा लाख 69 हजार रुपये होत आहे. बोऱ्हाडेवाडीत एक हजार 288 सदनिका असून किंमत आठ लाख 71 हजार आहे. अनुदान वजा जाता एक सदनिका केवळ सहा लाख 21 हजार रुपयांत मिळणार आहे.

रावेत येथील प्रकल्पात 934 सदनिका. एका सदनिकेची किंमत नऊ लाख 45 हजार रुपये. अनुदानामुळे केवळ सहा लाख 95 हजार रुपयांत सदनिका मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.