Pimpri News: कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या 90,738 नागरिकांकडून तब्बल 4 कोटी 58 लाखांचा  दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कविना फिरणे, सुरक्षित अंतर न पाळणे, विनाकारण बाहेर फिरणा-या तब्बल 90 हजार 738 नागरिकांवर आजपर्यंत कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 58 लाख 43 हजार 416 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून महापालिकेकडून नागरिकांना मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा या कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाची पहिली, दुसरी अशा तीव्र लाटा येऊन गेल्या. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परंतु, अद्यापही अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत. परंतु, निर्बंध शिथील होताच नागरिकांची बेफिकीरीही वाढत आहे.

महापालिका प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाई केली जाते. आजपर्यंत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 5 हजार 980 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 15 लाख 35 हजार 400 रुपये दंड वसूल केला. मास्कविना फिरणा-या 83 हजार 573 जणांकडून 4 कोटी 17 लाख 86 हजार 514 रुपये दंड वसूल केला. तर, सुरक्षित अंतर न बाळगणा-या 1 हजार 102 जणांकडून 24 लाख 80 हजार रुपये दंड वसूल केला आहे. याशिवाय कोणत्याही कारणाशिवाय बाहेर फिरणा-या 168 नागरिकांकडून 1 लाख 26 हजार 500 रुपये दंड वसूल केला. असे आजपर्यंत 90 हजार 738 नागरिकांवर कारवाई करत 4 कोटी 58 लाख 43 हजार 416 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणा-या बार आणि रेस्टॉरंटवरही कारवाई केली आहे. पहिल्यांदा नियमाचे उल्लंघन करणा-या 1 हजार 370 जणांकडून 34 लाख 25 हजार रुपये, दुस-यांवेळी उल्लंघन करणा-या 103 जणांकडून 5 लाख 15 हजार रुपये आणि तिस-यांदा नियमाचे उल्लंघन करणा-या 11 नागरिकांकडून 90 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असे तीनवेळा नियमांचे उल्लंघन केलेल्या 1 हजार 380 नागरिकांकडून 40 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.