Pimpri News : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे आणि तिच्या सहकारी वकीला विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कविता संदेश अल्हाट (वय 41, रा. मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री केतकी चितळे आणि तिचे सहकारी वकील यांनी फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक व मानहानीकारक मजकूर असलेली पोस्ट केली. याद्वारे आरोपींनी समाजामध्ये द्वेषाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याची कृती केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 505 (2), 500, 501, 153, आयटी ॲक्ट कलम 71 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

केतकी चितळे हिने शुक्रवारी (दि. 13) फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानंतर सुरुवातीला मुंबई आणि परिसरात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनिवारी (दि. 14) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.