Pimpri News: ‘पीएमपी’ संचालक मंडळावर होणार पिंपरी महापालिकेतील एका नगरसेवकाची निवड

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या संचालक मंडळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेतून निवड झालेल्या एका नगरसेवकास संचालक म्हणून नेमणुकीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीने आयत्यावेळी मंजूर केला आहे. तसेच संचालक पदनिर्मीतीस सरकारची मान्यता घेण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.

सन 2007 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही परिवहन संस्थेचे एकत्रीकरण होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. हि संस्था स्थापन करण्यात आली.

संस्था स्थापन झाल्यानंतर सरकारच्या निर्णयाद्वारे संचालक मंडळाची रचना अंतिम करण्यात आली. यामध्ये पुणे महापालिकेचे तीन संचालक घेतले. त्यात महापौर, स्थायी समिती सभापती आणि महासभेतून निवडून आलेलया एका नगरसेवकाचा समावेश करण्यात आला.

तर, पिंपरी-चिंचवड पालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा दोन संचालकांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे पुणे पालिकेप्रमाणे पिंपरी पालिकेचाही एक जादा संचालक असणे आवश्यक आहे. जेणेकरुन पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोईसाठी परिवहनचा पाठपुरावा करणे सोईचे होईल.

पिंपरी पालिकेच्या महासभेमधून निवड झालेल्या एका नगरसेवकास संचालक म्हणून नेमणुकीस मान्यता द्यावी. या संचालक पदनिर्मीतीस शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रशानाने पाठपुरावा करावा अशी सूचना करत स्थायी समितीने या प्रस्तावाची अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.