Pimpri News: वाढीव खर्चांना मान्यता देण्याचा ‘स्थायी’चा विक्रम; विरोधकांची अर्थपूर्ण ‘चुप्पी’ ?

दोन सभांमध्ये तब्बल 30 कोटी रुपयांच्या वाढीव-सुधारित खर्चाला दिली मान्यता

विरोधात असताना वाढीव खर्चावर बोलणा-या भाजपला वाढीव खर्चाचे कळले ‘मूल्य’

एमपीसी न्यूज – विकास कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या वाढीव-सुधारित खर्चांना मंजुरी देण्याचा पिंपरी महापालिका स्थायी समितीने विक्रम केला आहे. मागील दोन सभांमध्ये तब्बल 30 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला विनाचर्चा आयत्यावेळी मान्यता दिली गेली. व्हिट्यामिन ‘एम’ मिळत असल्याने विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सदस्यांचे मौन सर्व काही सांगून जात आहे. दोन महिन्यांनी समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे जाता-जाता वाढीव खर्चाच्या माध्यमातून ‘विकास’ साधला जात असल्याचे बोलले जात आहे.

विरोधात असताना भाजपने वाढीव – सुधारित खर्चाला जोरदार आक्षेप घेतला होता. वाढीव खर्चातून ‘कोट कल्याण’ केले जात असल्याचे आरोपही भाजपकडून तत्कालीन सत्ताधा-यांवर केले. तर सत्ता मिळविण्यासाठी ‘ना खाऊंना ना खाने दुंगा’ अशा लोकप्रिय घोषणाही दिल्या होत्या. मात्र, सत्तेत येताच त्याला हरताळ फासला गेला.

सध्या केवळ केवळ तुंबड्या भरण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. वाढीव खर्चाच्या नावाने गळा काढत सत्तासोपान चढणा-या सत्ताधारी भाजपलाही आता वाढीव खर्चाचे ‘मूल्य’ कळले आहे. त्यातूनच आता कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चांना मान्यता दिली जात आहे.

स्थायी समितीचा कार्यकाळ संपण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. फेब्रुवारीअखेर समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. केवळ आठ सभा शिल्लक आहेत. त्यामुळे वाढीव खर्चांना मान्यता देण्याचा विक्रम केला जात आहे. कोणत्याही विषयात कोणतेही विषय घुसडले जात आहेत. त्यातून आर्थिक विकास साधण्याचा स्थायी समिती सदस्यांचा प्रयत्न सुरु झाला आहे.

जाता-जाता स्थायी समिती सदस्य वाढीव खर्चातून जोरदार ‘बँटिंग’ करत आहे. मागील दोन सभांमध्ये तब्बल 29 कोटी 71 लाख 16 हजार रुपयांच्या वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेची अर्थपूर्ण चुप्पी !

स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे दहा, भाजप सहयोगी अपक्ष एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक असे 16 सदस्य आहेत. सत्ताधारी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या वाढीव -सुधारित खर्चाला मान्यता दिली जात आहे. कोणत्याही चर्चेविना बिनबोभाट मान्यता घेतली जात आहे. वाढीव खर्चांना मान्यता देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे स्थायी समितील सदस्य मौन बाळगतात. आपला विरोध नोंदवत नाहीत, हे संशायस्पद आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थायी समिती अध्यक्षांकडून उत्तर देण्यास टाळाटाळ !

याबाबत विचारले असता स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, विकास कामाचे पुढचे नियोजन राहिले असेल. काम शिल्लक असेल, तर प्रशासन वाढीव खर्चाची मान्यता देण्याचा प्रस्ताव देते. त्यांच्या सांगण्यानुसार खर्चाला मान्यता दिली जाते. प्रशासनाचे नव्हे तर काही वाढीव खर्चाचे सदस्यपारित देखील ठराव असल्याचे विचारले असता ‘पाहून घेतो आणि सांगतो’ असे सांगत लोंढे यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

मुदतीत कामे पूर्ण होत नाहीत, स्थायी समिती जाब विचारत नाही !

महापालिकेकडून कंत्राटदाराला विकास काम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली जाते. त्यानुसार प्रशासनाने दिलेल्या मुदतीतच कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु, कामे मुदतीत पूर्ण केली जात नाहीत. त्यासाठी वाढीव खर्च केला जातो. काम मुदतीत न केल्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन, स्थायी समिती सदस्य वाढीव खर्चाचे प्रस्ताव स्थायी समिती सभेर मान्यतेसाठी आणतात.

वाढीव -सुधारित खर्चाचे प्रस्ताव रितसर विषयपत्रावर आणले जात नाहीत. त्याची चर्चा होवू नये यासाठी आयत्यावेळी प्रस्ताव सभेसमोर मांडले जातात. त्याला विरोध करणे अपेक्षित असताना स्थायी समिती बिनबोभाट मान्यता देते. विरोधकही मौन बाळगतात. कारण, त्यातून आर्थिक विकास साधला जातो, हे सर्वश्रूत आहे.

23 डिसेंबर 2020च्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिलेले विषय !

# महापालिकेच्या वतीने थेरगाव-बापुजीबुवानगर येथे उभारण्यात येणा-या रुग्णालयाच्या कामासाठी 14 कोटी 30 लाखांच्या वाढीव खर्चाच्या नगरसेवकांनी आयत्यावेळी आणलेल्या प्रस्तावाला बिनबोभाट मान्यता दिली. त्यामुळे रुग्णालयाचा खर्च 48 कोटी 93 लाखांवरुन 63 कोटी 25 लाखांवर पोहोचला आहे.

30 डिसेंबरच्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिलेले विषय !

#महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या भुयारीमार्गासाठी साडेचार कोटीच्या सदस्य पारित प्रस्तावाला विनाचर्चा आयत्यावेळी मान्यता दिली.

# भोसरीतील चर बुजविण्याच्या कामात सीडी वर्कचे (नाल्यावर स्लॅब टाकणे) काम घुसडण्यात आले. या कामावर तब्बल साडेसात कोटी वाढीव खर्च करण्यात आला आहे. प्रशासनाच्या प्रस्तावाला आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

# महापालिका कार्यशाळा विभागातील कामांसाठी 2 कोटी 10 लाख रुपयांच्या वाढीव खर्चाच्या सदस्य प्रस्तावाला विनाचर्चा मान्यता दिली.

# दफनभूमीसाठी काळजीवाहक पुरविणे याकामाच्या प्रशासनाच्या 32 लाख 16 हजार 690 रुपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला आयत्यावेळी मान्यता.

# औंध – रावेत बीआरटीएस मार्गावर पार्क स्ट्रीट समोर बांधण्यात येत असलेल्या सब – वेच्या वाढीव खर्चाच्या 96 लाख 97 हजारांच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला आयत्यावेळी विनाचर्चा मान्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.