Pimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या बाबतीतील उपाययोजनांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय, हेळसांड होत आहे. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने त्वरित पूर्णवेळ विशेष अधिकारी नेमावे. त्याद्वारे सीसीसी सेंटरची दैनंदिन पाहणी व योग्य नियोजन करावे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात साठे यांनी म्हटले आहे की, या अडचणीच्या काळात नागरिकांना गैरसोय, अडचणी व मनस्ताप होत आहे. त्याबाबतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची उपलब्ध यंत्रणा अपुरी व कमकुवत आहे.

महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या व खासगी संस्थेकडून संचलित असलेल्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये अनेक अपूऱ्या सुविधा आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ विशेष अधिकारी नेमावा. सर्व प्रथम नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. गैरसोयींना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.