Pimpri News : ‘वायसीएम’च्या प्रांगणात रामकृष्ण मोरे यांचा पुतळा उभारा

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा पुतळा वायसीएम रुग्णालयाच्या प्रांगणात उभारण्यात यावा, अशी मागणी जगद्गुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी केली आहे. याबाबत निवेदन त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिले आहे.

रानवडे यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील सात महिन्यांच्या कोरोना काळात वायसीएम रुग्णालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज असलेले व पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार अशी प्रतिमा असलेल्या प्रा. मोरे यांच्या दूरदृष्टीतूनच शहराचा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण तसेच चिरंतन आठवण म्हणून ‘वायसीएम’च्या प्रांगणात प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा पुतळा उभारावा असे त्यांनी म्हटले आहे.

प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचे या शहरासाठी असलेले योगदान व त्यांच्या नेतृत्वकाळात या शहराचा झालेला सर्वांगीण विकास ही त्यांच्या दूरदृष्टीची फळे आहेत. प्रा. मोरे यांचा पक्ष तसेच राजकीय संबंध याचा विचार न होता या शहराच्या विकासरथाचे सारथी व मार्गदर्शक ते होते ही बाब ध्यानात ठेऊन हा विषय मार्गी लावावा अशी मागणी रानावडे यांनी या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.