Pimpri News : गैरहजर कर्मचाऱ्याची लावली हजेरी, आरोग्य निरीक्षकाची वेतनवाढ स्थगित

एमपीसी न्यूज – मुख्य आरोग्य निरीक्षकांची स्वाक्षरी झाल्यानंतर हजेरीपत्रात फेरफार करुन गैरहजर कर्मचा-याची हजेरी लावल्याप्रकरणी आणि विनापरवाना गैरहजर राहणा-या आरोग्य निरीक्षकाची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.

सचिन गुलाबराव जाधव, असे वेतनवाढ स्थगित केलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. जाधव आरोग्य निरीक्षक गट क दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे प्रभाक क्रमांक 9 मधील नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, खराळवाडी परिसरातील आरोग्य विषयक कामकाज करुन घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हजेरीपत्रकावर मुख्य आरोग्य निरीक्षकांची स्वाक्षरी झाल्यानंतर सफाई कामगार राजेंद्र भोईटे यांचे नाव हजेरीपत्रकात नमूद करुन 2017-18 मधील सर्व उपस्थिती दाखविली. त्यानंतर हे हजेरीपत्रक ‘क’ क्षेत्रीय कार्यालयास मंजुरीसाठी सादर केले.

कर्मचारी कामावर नसतानाही हजर असल्याचे दाखवून मुळ हजेरीपत्रकामध्ये फेरफार करुन स्वत:च्या आर्थिक लाभासाठी महापालिकेची फसवणूक केली. त्याचबरोबर फेब्रुवारी 2018 ते डिसेंबर 2018 अखेर 114 दिवस जाधव यांनी विनापरवाना गैरहजर राहून आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण केला.

खातेनिहाय चौकशीत जाधव यांच्यावर सर्व दोषारोप सिद्ध झाले. तसेच त्यांचा खुलासा संयुक्तिक नाही. त्यामुळे क्षेत्रीय अधिका-यांनी कारवाईची शिफारस केली आहे. त्यानुसार आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. यापुढे कोणतेही कार्यालयीन गैरवर्तन केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, डिसेंबर 2012 ते जानेवारी 2020 या कालावधीत एकूण 1089 दिवस विनापरवाना गैरहजर राहणारे सफाई कामगार चेतन गोरगेल यांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.