Pimpri News: कोरोना टेस्टिंगवेळी चुकीचा पत्ता द्याल तर कारवाई- आयुक्त हर्डीकर

दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नियमाधिन कारवाई करण्यात येईल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक कोरोना टेस्टिंगसाठी गेल्यावर तिथे खोटा अथवा चुकीचा पत्ता, नाव व मोबाइल नंबर देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यामध्ये बाधा निर्माण होत आहे. अशी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नियमाधिन कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

वाढत्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि यंत्रणेची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आयुक्त हर्डीकर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.31) आढावा बैठक घेण्यात आली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या आणि भविष्यात करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, उपायुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्यासह सर्व क्षेत्रिय अधिकारी तसेच महापालिका रूग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोना सदृश्‍य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या महापालिका रूग्णालये अथवा खासगी रूग्णालयांमार्फत चाचण्या करण्यात येत आहेत. शिवाय करोनाबाधित रूग्ण आढळल्यास या रूग्णाच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार, तपासण्या, चाचण्या अथवा मार्गदर्शनपर सूचना करण्याचा महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.

या सर्व प्रक्रियेत नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. मात्र काही नागरिक कोरोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी खोटा अथवा चुकीचा पत्ता देत असल्याने प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात बाधा निर्माण होत आहेत. असे चुकीचे पत्ते व दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.