Pimpri News: अखेर फॉर्च्युन ‘स्पर्श’वर कारवाई, ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह पालिकेने केले अधिग्रहित

काळ्या यादीत का टाकू नये, फौजदारी कारवाई का करू नये, अशी 'स्पर्श'ला कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमधील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे घेणे, नफेखोरीसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खुल्या बाजारात विकणे यावरुन हॉस्पिटल संचलन करणारी  फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही संस्था रुग्णांना मोफत, समाधानकारक सुविधा देण्यात, कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. याबाबी कराराचा भंग करणाऱ्या ठरल्या,  मानवतेला काळीमा फासणाऱ्या गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणे, स्पर्शचे हॉस्पिटल व्यवस्थापन निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचा ठपका ठेवत आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्श चालवीत असलेले ऑटो क्लस्टर हॉस्पिटल डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह तत्काळ प्रभावाने आजपासून अधिग्रहित केले.  तसेच स्पर्शला काळ्या यादीत का टाकू नये, फौजदारी कारवाई का करू नये, अशा अशयाची कारणे दाखवा नोटीस बजावत चार दिवसांत खुलासा मागविला आहे.

ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे मागणे आणि महापालिकेने येथील रुग्णांना देण्यासाठी वितरित केलेले रेमडेसिवीर इंजेक्शन खुल्या बाजारात विकण्याकरिता प्रतिबंध असताना नफेखोरीसाठी विकणे यावरून स्पर्श रुग्णांना मोफत, समाधानकारक सुविधा देण्यात अपयशी ठरली. ही बाब महापालिका आणि स्पर्श हॉस्पिटल यांच्यातील कराराची भंग करणारी ठरली.

महापालिकेने शहरातील नागरिकांना मोफत आणि सुलभ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि कोरोना रुग्णांची हेळसांड न होता चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळावी. या उद्देशाने जम्बो कोविड हॉस्पिटल, ऑटो क्लस्टरमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी सर्व पायाभूत सुविधा, ऑक्सिजन, औषधे, सर्व प्रकारची उपकरणे, उपभोग्य वस्तू, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, स्पर्श हॉस्पिटल कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णतः अपयशी झाले.

बेडसाठी पैसे मागणे आणि महापालिकेने रेमडेसिवीरचा तुटवडा असताना मोठ्या मुश्किलीने मिळविलेली रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणे यामुळे स्पर्श अपयशी ठरल्याचे अजून अधोरेखित होते. अशा प्रकारच्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या कृत्यांमध्ये स्पर्शच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे आणि त्यांच्यावर पर्यवेक्षण करणाऱ्या व्यवस्थापनाचे अपयश निदर्शनास आणण्यात आले.

स्पर्श हॉस्पिटल यांचे एकूणच हॉस्पिटल व्यवस्थापन निकृष्ट गुणवत्तेचे असल्याचे आणि गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसून येते. त्यामुळेच स्पर्श व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित होत आहे.

त्यामुळे स्पर्श हॉस्पिटल चालवित असलेले महापालिकेचे ऑटो क्लस्टर येथील कोविड  हॉस्पिटल तत्काळ प्रभावाने आजपासून महापालिकेने अधिग्रहित केले. हॉस्पिटलमध्ये सेवा देत असणारे स्पर्शचे, इतर संस्थेचे डॉक्टर, वैद्यकीय तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा देखील अधिग्रहित केल्या आहेत.

यानुसार यापुढे ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये सेवा देणारी प्रत्येक व्यक्ती सदरच्या वैद्यकीय किंवा इतर सेवा सुरळीत चालविण्याकरिता हॉस्पिटल चालू असेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या पद्धतीने महापालिका व्यवस्थापनाच्या अधीन काम करेल.

ऑटो क्लस्टर हॉस्पिटल सुरळीत चालविण्याकरिता अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची मुख्य समन्वयक अधिकारी आणि प्रभारी ऑटो क्लस्टर हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल, डॉ. अभयचंद्र दादेवार यांची वैद्यकीय समन्वयक आणि प्रभारी वैद्यकीय सेवा, प्राध्यापक डॉ. मनजित संत्रे, सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष थोरात, डॉ. अतुल देसले, डॉ. आनंद करळे,  वैद्यकीय अधिकारी डॉ. शगुन पिसे यांची नियुक्ती केली आहे.

स्पर्श हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंडे यांनी सर्व पायाभूत सुविधा, वैद्यकीय व इतर उपकरणे, सर्व प्रकारची औषधे, उपभोग्य वस्तू किंवा माहिती, सर्व प्रकारच्या प्रणाली त्यांच्या चावीसहित किंवा पासवर्डसहित सुस्थितीत ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटलचा प्रभार डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे आजरोजी तात्काळ प्रभावाने सुपूर्द करण्याचा आदेश आयुक्त पाटील यांनी दिला.

या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास किंवा ऑटो क्लस्टरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या वैद्यकीय उपचारामध्ये बाधा येईल किंवा हानी पोहोचेल, महापालिकेच्या प्रतिमेस हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष केल्यास डॉ. होळकुंडे यांच्यासह त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन फौजदारी कारवाईस पात्र ठरेल.

स्पर्श हॉस्पिटलने महापालिका सोबतच्या कराराचा भंग केल्याने, पालिकेची बदनामी करण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्या मानसिक त्रासास कारणीभूत ठरल्याचे निदर्शनास आले आहे.

या आदेशाद्वारे स्पर्श हॉस्पिटल, आस्थापनेला काळ्या यादीत का टाकू नये किंवा आपल्या विरोधात फौजदारी कारवाई का करण्यात येवू नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटीसचे उत्तर चार दिवसांत देणे बंधनकारक असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.

ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आजरोजी नियमानुसार देय असलेले वेतन, भत्ते, अटी-शर्तीसहित पुढील वेतन भत्ते महापालिकेमार्फत देण्यात येतील. येथे सेवा देणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या सेवा आपल्या लेखी परवानगीशिवाय विखंडीत करता येणार नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

नेमका काय घडला होता प्रकार?

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करत होती. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी खासगी हॉस्पिटलच्या मदतीने ‘स्पर्श’च्या सल्लागाराने एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

यावर सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा झाली होती. याप्रकरणी स्पर्शचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे आणि एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. स्पर्शकडून दहा दिवसांत काम काढून घेण्याचा आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनला दिला होता.

स्पर्श  संस्थेवर कारवाई करावी अन्यथा जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असा  पोलीस आयुक्तांनी इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अखेर फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर या खासगी संस्थेवर कारवाई केली आहे. त्यांची सेवा महापालिकेने अधिग्रहित केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.