Pimpri News: नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्या, नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची पालिका आयुक्तांना विनंती

एमपीसी न्यूज – अनलॉकमध्ये नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु झाली आहेत. पण, नाटकांसाठीच्या भाडे दर जास्त आहेत. ते परवडणारे नाहीत. मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देऊ केली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, अशी मागणी सिनेअभिनेते नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहे. शहरातील नाट्यगृहांच्या भाडे दराबाबत चर्चा करण्यासाठी सिनेअभिनेते नाट्यकर्मी प्रशांत दामले यांच्या नेत्तृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रम, संयोजन आणि नाट्य व्यवस्थापकांच्या शिष्टमंडळाने आज पालिकेस भेट दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने अनलॉकमध्ये 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चार नाट्यगृहे आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (1200 आसनक्षमता), भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह (950 आसनक्षमता), पिंपरी संत तुकारामनगरमधील आचार्य अत्रे रंगमंदिर (850 आसनक्षमता) आणि पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर आहे.

नाट्यगृहे 50 टक्के मर्यादेत सुरु आहेत. पण, नाटकाचा खर्च पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे दर कमी करण्याची मागणी दामले यांनी केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, नाटककारांच्या काही अडचणी आहेत. आता नाट्यगृहे सुरु झालेली आहेत. पण, ती 50 टक्के क्षमतेने सुरु झाली आहेत. नाट्यगृहांचे नाटकांसाठीचे भाडे दर त्यांना परवडणारे नाहीत. अगोदर थिएटर 50 टक्के मर्यादा असेल आणि त्यात लोक कमी येतील. पण, नाटकाचा खर्च पूर्णच करावा लागतो. मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देऊ केली आहे. आपल्याकडेही ती मिळावी असे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.