Pimpri News: अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचा गैरपद्धतीने महापालिकेत ठिय्या – योगेश बहल

तात्काळ कार्यालय खाली करावे; त्यांना निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार गैरपद्धतीने महापालिकेत ठिय्या मांडून बसले आहेत. त्यांना निलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी करावी. कोणतेही अधिकार नसताना त्यांनी घेतलेल्या तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय निर्णयांची चौकशी करुन निर्णय रद्द करावेत, अशी मागणी माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केली आहे.

तसेच अजित पवार यांना महापालिकेत बसण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तत्काळ कार्यालय खाली करावे अशी मागणीही त्यांनी केली.

कासारवाडी येथे आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना योगेश बहल म्हणाले, कोरोना कोविड सेंटरमधील बिलांमध्ये अजित पवार यांनी मोठा गैरव्यवहार केला आहे.

पवार बेकायदेशीररित्या महापालिकेत कार्यरत आहेत. त्यांची 5 सप्टेंबर 2019 रोजी जातपडताळणी समितीच्या पुणेच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

त्यांना 19 सप्टेंबर 2019 रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाचे डॉ. माधव वीर यांनी दिले असतानाही त्यांनी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार सोडला नाही. त्यांनी शासन आदेशाचा भंग केला आहे. बेकादेशीरपणे ते अतिरिक्त आयुक्तपदावर ठिय्या मांडून बसले आहेत.

अजित पवार यांनी 5 सप्टेंबर 2019 पासून आजपर्यंत कोणतेही अधिकार नसताना घेतलेल्या तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांची चौकशी करावी. हे निर्णय रद्द करावेत. त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय हे बेकायदेशीर असल्याने त्यांच्याकडून ते तत्काळ वसूल करण्यात यावेत.

पवार यांना महापालिकेत बसण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी पालिकेतील कार्यालय तत्काळ खाली करावे, अशी मागणी नगरसेवक बहल यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.