Pimpri News: ‘स्पर्श’साठी प्रभारी अतिरिक्त आयुक्तांचा आटापिटा, लिपिकाला नोटीस अन् ‘ऑन द स्फॉट’ खुलासा

एमपीसी न्यूज – एकाही रुग्णावर उपचार न करणा-या स्पर्श हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची बीले देण्यास विरोध करणारी टिप्पणी लिहिणा-या मुख्य लिपिकाला महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी चांगलीच दमबाजी केली. फाईलमधील टिप्पणी बाहेर पडलीच कशी ?, असा जाब विचारत त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली. एवढेच नव्हे तर खुलाशाची संधी न देता ‘ऑन द स्फॉट’ लेखी अर्ज घेतला आहे.

मंगळवारी (दि.9) रात्री साडेआठ वाजेपर्यंत लिपिकाला कार्यालयात बसवून ठेवले. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक हित सांभाळणा-या कर्मचा-यावर कोणासाठी कारवाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये कधीच एकही रुग्ण दाखल झालेला नसताना स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत तब्बल 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बीले महापालिकेला सादर केल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासकीय टिप्पणीतून उघडकीस आला आहे.

तसेच एकाही रुग्णावर उपचार केले नसताना महापालिकेने स्पर्शला साडेतीन कोटी रुपये अदा केले आहेत. अधिकारी-पदाधिका-यांनी संगनमताने ही लूट केल्याचा आरोप होत आहे. सत्ताधारी भाजपवर याचे बील फाडले जात आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन्हीही संस्थेमार्फत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. त्यांच्यासमवेत करारनामाही करण्यात आलेला नाही.

दोन्हीही सेंटरमध्ये कधीच एकही रुग्ण दाखल झालेला नसताना ‘स्पर्श’चे सीईओ डॉ. अमोल हाळकुंदे यांच्यामार्फत महापालिकेला सादर करण्यात आलेली पाच कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बिले चुकीची, पालिकेची फसवणूक करण्याच्या हेूतूने सादर केली आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. त्याकरिता डॉ. हळकुंदे दोषी आहेत. यास्तव त्यांच्यावर नियमाधीन कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी असा महत्वपूर्ण शेरा मुख्य लिपिकाने दिला आहे.

एका लिपिकाने त्याला निदर्शनास आलेली घटना टिप्पणीवर लिहिली. मात्र, यावरुन प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंगळवारी (दि.9) रात्री लिपिकाला कार्यालयात बोलावून घेतले. टिप्पणीला पाय कसे फुटले.

ही टिप्पणी लोकप्रतिनिधी, पत्रकारांकडे कशी गेली असा जाब विचारला. रात्री साडे आठ वाजेपर्यंत त्याला कार्यालयात थांबवून ठेवले. कारणे दाखवा नोटीस बजाविली आणि ‘ऑन द स्फॉट’ खुलासा करुन घेतला. खुलाशाला साधा वेळही दिला नाही. महापालिकेचे आर्थिक हित पाहणा-या आणि सत्य परिस्थिती मांडणा-या कर्मचा-यावर कोणासाठी कारवाई केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत प्रभारी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ”कोविड केअर सेंटरबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. नेहमीचा लिपिक रजेवर गेल्यानंतर तात्पुरत्या लिपिकाकडून दमदाटी देऊन नोट तयारी करुन घेतली. अमोल हळकुंदे दोषी आहे, अशी दीड पाण्याची नोट तयार करुन घेतली.

लिपिकाने स्वाक्षरीला विरोध केला असतानाही त्याची स्वाक्षरी घेतली. मी रजेवर होतो. एका पत्रामुळे सीसीसी सेंटरबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. हा कोण लिपिक आहे म्हणून मी त्याला बोलवून घेतले. त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. रात्री त्याने खुलासा केला आहे. उद्या सकाळी हे सगळे प्रकरण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.