Pimpri news: ‘अतिरिक्त आयुक्त पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांचे सर्व अधिकार काढा’

महासभेत महापौर उषा ढोरे यांचा आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (मंगळवारी) कोरोना ‘कमिशन’वरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात चांगलेच आरोप -प्रत्यारोप रंगले. तब्बल पाच तास चर्चा रंगली. अखेरीस अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांचे सर्व अधिकार काढण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिले. स्पर्श हॉस्पिटलला अदा केलेल्या बिलांची चौकशी करून येत्या महासभेत सविस्तर चौकशी अहवाल सादर करावा. ऑक्सिजन पुरवठादार ‘गॅब’ संस्थेला काळ्या यादीत टाका, असाही आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी वायसीएम रुग्णालयाकरिता वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. या विषयावर तब्बल पाच तास चर्चा झाली.

या मुद्यावरून भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी कार्यकाळातील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची दुकानदारी, पार्टनरशिप यावर बोट ठेवले. तर कोरोना काळात भाजप नगरसेवकांनी कमविलेल्या ‘कोरोना कमिशन’चे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी वाभाडे काढले.

यात प्रामुख्याने ऑक्सीजन पुरवठादार गॅब संस्थेला दिलेले 15 वर्षासाठीचे कंत्राट, स्पर्श हॉस्पिटलला दिलेले तीन कोटी 18 लाखाचे बील अदायगी यावर घमासान चर्चा झाली. त्यातून मग अधिकाऱ्यांवर खापर फोडण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, न्यूरो सर्जन डॉ. अमित वाघ यांच्यावर ठेका घेणे, ठेकेदारांना पोसणे, लाच घेणे, विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदेतील अटी- शर्ती निश्चित करणे, निविदेतील कागदपत्रे परस्पर बदलणे, अधिकार कक्षा ओलांडणे, नगरसेवकांना पोसणे असे गंभीर आरोप या अधिकाऱ्यांवर करण्यात आले.

याच चर्चेत अधिकाऱ्यांच्या बाजूने आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलणे असे नगरसेवकांचे दोन गट पडलेले दिसून आले.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सीमा सावळे, आशा शेंडगे, तुषार कामठे, तुषार हिंगे, अभिषेक बारणे, संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, राष्ट्रवादीकडून माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अजित गव्हाणे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, सचिन भोसले, मीनल यादव यांनी भूमिका मांडली. यावर आयुक्तांनी खुलासाही सादर केला.

चर्चेअंती महापौर उषा ढोरे यांचा पारा चढला. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांच्यावर सभागृहात नगरसेवकांनी केलेले आरोप गंभीर आहेत. या दोघांचेही सर्व अधिकार तत्काळ काढून घ्यावेत. ऑक्सिजन पुरवठादारामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. त्याला काळ्या यादीत टाकावे. स्पर्शला अदा करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करावी. धूळफेक करून बिले लाटणा-यांनाही काळ्या यादीत टाकावे. निर्मळ आणि पारदर्शक कारभार झाला पाहिजे.

या प्रकरणाची लवकरात-लवकर सखोल चौकशी करून अहवाल सादर करा, रात्रंदिवस चौकशी करा आणि येत्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशही महापौरांनी आयुक्तांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.