Pimpri News: ऑक्सिजनयुक्त खाटा पुरेशा, व्हेंटिलेटर खाटांची कमतरता

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर गंभीर रुग्णांचाही संख्या वाढू लागली आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या खाटांची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनयुक्त खाटा पुरेशा आहेत. पंरतु, अतिगंभीर रुग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर खाटांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे खाटांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असून खाट मिळेनासे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला साडेतीन हजाराहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. गंभीर, अतिगंभीर रुग्णांची भर पडत आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटर खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऑटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर, बालनगरी व घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसणाऱ्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त काही खासगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांवर उपचार केले जातात.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे शहरातील खाटांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका रुग्णालयातील खाटा पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. महापालिकेने शहरातील 60 खासगी रुग्णालयांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत. या रुग्णालयातील एकुण खाटा पैकी किमान 50 टक्के खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवले आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर खाटांची कमतरता आहे.

वायसीएम, ऑटो क्लस्टर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची एकही खाट शिल्लक नाही. नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये आयसीयू असलेल्या व्हेंटिलेटरच्या 25 खाटा शिल्लक आहेत. महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार शहरात 144 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 117 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”सद्यस्थितीत रुग्णांना खाटा उपलब्ध होत आहेत. ऑक्सिजनयुक्त खाटांची अधिक कमतरता नाही. परंतु, व्हेंटिलेटर खाटांची मोठी कमतरता आहे. ऑटो क्लस्टर, वायसीएम फुल्ल आहे. तथापि, खासगी रुग्णालयातही व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध होत आहेत. परंतु, खासगीत रुग्ण दाखल होत नाहीत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment