Pimpri News : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष – बशीर सुतार

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्याची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून वादावादीच्या घटनाही घडत आहेत. मात्र, प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना पिंपरी चिंचवड शहर कार्यालयप्रमुख बशीर सुतार यांनी केला आहे.

याबाबत सुतार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवदेन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही भागात गेले असता रस्त्याची दयनीय अवस्था पहायला मिळते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळून अपघात होत आहेत. वाहनचालकांमध्ये वादावादी, हाणामारी असे प्रकारही घडत आहेत.तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकांमध्ये मणक्यांचे आजारही वाढू लागले आहेत.

महापालिकेच्या ‘सारथी’ संकेतस्थळावर परिसरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच या तक्रारींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले.

महापालिका प्रशासनाचे रस्ते खोदाई करणाऱ्या विविध संस्थांवर कोणताही वचकी नाही. त्यामुळे रस्ते खोदाई केल्यानंतर त्याची दुरुस्ती करणे किंवा खड्डे बुजविणे याकडे संबधीत संस्थांकडून डोळेझाक केली जात आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिका प्रशासनाकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, उच्च शिक्षित अधिकारी वर्ग, निधी आणि पुरेशे मनुष्यबळ आहे. मात्र, तरीही करदात्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यात प्रशासन कमी पडताना दिसत असल्याचे बशीर सुतार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.