Pimpri News: अग्निशमन वाहन खरेदीसाठी प्रशासनाचा 5 कोटींचा प्रस्ताव, सत्ताधा-यांचा 10 कोटींच्या खर्चाचा आग्रह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी महागड्या उपकरणांसह नऊ कोटी रुपयांची वाहने खरेदी करण्याचा प्रशासनाने प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. पण, सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीने दहा कोटी रुपयांची सहा हजार क्षमतेची फायर टेंडर (Fire Tender) ची दोनऐवजी चार वाहने खरेदी करण्याचा आग्रह धरला. उपसूचनेद्वारे चार वाहने खरेदीस आणि त्यासाठी येणा-या वाढीव खर्चास मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर आज आचारसंहिता लागू झालेली असती. पण, कोरोना, ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक पुढे ढकलली. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांना हा जानेवारीचा महिना कामासाठी मिळाला. हा मिळालेला कालावधी बोनस समजून सत्ताधा-यांनी वाढीव खरेदीला मान्यता देण्याचा सपाटाच लावला आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वापरासाठी Flood Rescue उकरणांसह एक व्हॅन, फायर टेंडर सहा हजार क्षमतेची दोन वाहने नग, बीई सेट एक व्हॅन आणि फायरफायटिंग वॉटर मिस्ट मोटार बाईक तीन खरेदी करण्याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी 8 जानेवारी 2021 रोजीच्या पत्रानुसार कळविले होते. त्यासाठी वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये फायरफायटिंग वॉटर मिस्ट मोटार बाईक या वाहनाकरिता एकही निविदा प्राप्त झाली नाही. उर्वरित तीन वाहनांकरिता तीन निविदाधारकांनी दर दिला. त्यात चिखलीतील हायटेक सर्व्हिसेस यांनी Flood Rescue एका व्हॅनचा उकरणांसह 3.90 टक्के जादा म्हणजेच 2 कोटी 15 लाख 59 हजार 250 रुपये, फायर टेंडर 2 वाहनांचा 2.50 टक्के जादा म्हणजेच 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपये आणि बीई सेट एका व्हॅनचा 4 टक्के जादा म्हणजेच 2 कोटी 2 लाख 70 हजार 536 रुपये असे दर दिले. हे दर स्वीकारण्यास हरकत नसल्याबाबत अग्निशमन अधिकारी गावडे यांनी कळविले.

त्यानुसार आयुक्त राजेश पाटील यांनी उपकरणांसह 2 कोटी 15 लाख 59 हजार 250 रुपयांची Flood Rescue एक व्हॅन, सहा हजार क्षमतेची फायर टेंडर (Fire Tender) ची 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपयांची दोन वाहने आणि बीई सेटची 2 कोटी 2 लाख 70 हजार 536 रुपयांची एक व्हॅन हाय टेक सर्व्हिसेकडून खरेदी करण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. त्यावर सत्ताधारी भाजपने या प्रस्तावाला मान्यता देतानाच सहा हजार क्षमतेची फायर टेंडर (Fire Tender) ची 5 कोटी 25 लाख 2 हजार 140 रुपयांची दोन वाहने खरेदी करण्याऐवजी चार वाहने खरेदी करण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चाला उपसूचनेद्वारे मान्यता दिली. याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्यक्षात कार्यरत सहा अग्निशामक केंद्रे, महापालिकेचे भौगोलिक क्षेत्राचा कारण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.