Pimpri news: नाट्यमय घडामोडीनंतर ‘असे’ ठरले उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजप उमेदवाराचे नाव

केशव घोळवे यांना पाच महिन्यासाठी दिले पद?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपचे पाशवी बहूमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. पण, अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर घोळवे यांचे नाव अंतिम झाले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ताकद लावल्याने घोळवे यांना उपमहापौरपदाची ‘लॉटरी’ लागली आहे. मागील चार वर्षात एकही पद न मिळाल्याने नाराज असलेल्या वसंत बोराटे यांची संधी पुन्हा हुकली आहे. त्यांना पुढील सहा महिन्यांत उपमहापौरपद देण्याचे ठरले असल्याचे भाजप मधील सूत्रांनी सांगितले.

उपमहापौरपदासाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक होते. मागील चार वर्षांत एकही पद न मिळालेले, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक मोशीचे प्रतिनिधित्व करणारे वसंत बोराटे यांचे उपमहापौरपदासाठी नाव जवळपास निश्चित झाले होते.

अचानक केशव घोळवे उपमहापौरपदासाठी इच्छुक झाले. त्यांनी मुंडे गटाचे असलेल्या माजी शहराध्यक्षांशी संपर्क साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. जुना निष्ठावान गट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेला. त्यांना पक्षात होत असलेली घुसमट, अन्याय सांगितला.

पंकजा मुंडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत घोळवे यांना उपमहापौर करण्याची आग्रही भूमिका घेतली. तर, महेश लांडगे यांनी बोराटे यांच्यासाठी आग्रह धरला होता. माझा जवळचा कार्यकर्ता असून आपण त्याला शब्द दिला आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी निम्मा-निम्मा असा तोडगा काढला.

घोळवे यांना पुढील पाच ते सहा महिन्यासाठी पद देण्याचे ठरले आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. घोळवे यांचा राजीनामाही घेवून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पुढील सहा महिन्याकरिता बोराटे यांना उपमहापौरपदी संधी देण्याचे ठरले असल्याचे समजते.

या संपूर्ण प्रक्रियेत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तटस्थ रहाणे पसंत केले. पंकजा मुंडे यांनी जगताप यांच्याशीही संपर्क साधला होता, असे कळते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर घोळवे यांचे नाव निश्चित झाले.

उपमहापौर होणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीतील घोळवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उपमहापौर पदावर राहिल्याने उमेदवारी कापली जाण्याची शक्यता कमी आहे. कामगार नेते ही ओळख त्यांची जमेची बाजू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.