Pimpri News: आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीनंतर ‘वायसीएमएच’मधील स्टाफ नर्सेसचे आंदोलन मागे

एमपीसी न्यूज – महापालिका आस्थापनेवर कायस्वरूपी करण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच, राज्यशासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिल्यानंतर वायसीएमएचमधील स्टाफ नर्सेसनी आंदोलन मागे घेतले.

“कायम करा कायम करा, मानधन नर्स स्टाफला कायम करा” अशा घोषणा देत वायसीएम रुग्णालयाबाहेर सुमारे 150 परिचारिकांनी आज (मंगळवारी) सकाळी आंदोलन सुरु केले. याबाबत माहिती मिळताच आमदार महेश लांडगे यांनी आंदोलक नर्सेसची भेट घेतली. त्यानंतर परिचारिकांचे प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी माजी उपमहापौर, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका सुजाता पालांडे, रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे मध्यंतरी कोरोना रुग्णांवरच उपचार केले जात होते. पुणे अथवा पिंपरीमधील गंभीर रुग्ण याठिकाणी दाखल होते. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. कोरोना काळात या परिचारिकांना कायमस्वरूपी करून घेणार आणि वेतनवाढ देणार असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, त्यांच्या आश्वासनांची पूर्तता तर दूरच मानधनातही कपात करण्यात आल्याचा आरोपी आंदोलनकर्त्या नर्सनी घेतला आहे. रुग्णालयात गेल्या 12 वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ठराव केला होता. मात्र, अद्याप त्यांना मानधनावर ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात रात्रंदिवस सेवा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे गाऱ्हाणे आंदोलक नर्सेसनी आमदार लांडगे यांच्यासमोर मांडले.

महापालिका आस्थापनेवर कायस्वरूपी करण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच, राज्यशासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येईल. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, 25 हजार रुपये मानधनमध्ये 2 हजार रुपये कमी केले होते. मात्र, मानधनात 2 हजाराची वाढ(ESIC आणि PF साठी) करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. परिचारिकांना महिन्याच्या सुट्या, प्रत्येक 3 महिन्याला 10 हजार रुपये भत्ता चालू होता तो त्वरित मिळावा, यासाठी निश्चितपणे यशस्वी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी नर्सना दिले. त्यांनतर त्यांनी संप मागे घेतला आणि रुग्णालयाचे कामकाज सुरळीत झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.