Pimpri News: मुंगी इंजिनिअर्सने कामगारांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन स्थगित – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूजखेड तालुक्यातील निघोजे व चाकण येथील मुंगी इंजिनिअर्स या कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन बहुतांश मागण्या पूर्ण केल्यामुळे त्या कंपनीविरुद्धचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी घोषणा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.

खेड तालुक्यातील निघोजे व चाकण येथील मुंगी इंजिनिअर्स या कंपनीत कामगार कायद्यांचे उल्लंघन केले जात असून अनेक वर्षापासून याठिकाणी कामगार वापराबाबत अनुचित प्रकार सुरू असून कंपनी मालक कोणत्याही आदेशाला न जुमानता कामगारांची पिळवणूक करत आहे. कामगार कायदा व कामगारांची सुरक्षा धाब्यावर बसवून अनुचित काम करणाऱ्या मुंगी इंजिनियर्स या कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष संतोष बेंद्रे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली होती.

कंपनीचे मालक प्रफुल्ल मुंगी यांच्या बेहिशेबी मालमत्ता व अवैध संपत्तीची ‘ईडी’ मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी नाईक यांनी केली होती. मुंगी इंजिनियर्स या कंपनीवर कारवाई करण्याबाबत व कामगारांना न्याय मिळवून देण्याबाबत त्वरीत योग्य निर्णय न घेतल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा संतोष बेंद्रे, प्रदीप नाईक व कामगारांनी दिला होता.

बेंद्रे व नाईक यांनी कंपनीवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना स्वत: भेटून दिले होते. त्यानंतर या कंपनीची कामगार आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. कामगारांच्या मागण्यांबाबत कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेऊन बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कामगारांना न्याय मिळेल, अशी आशा आहे, असे प्रदीप नाईक म्हणाले.

कामगार आयुक्त कार्यालयाकडून मागण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापन नेहमीच कामगारांचा व कामगार कायद्याचा आदर करते आणि यापुढे देखील करणार आहे. तसेच यदा कदाचित आमच्याकडून काही त्रुटी राहिल्यास व त्या निदर्शनास आल्यास त्यात देखील आम्ही सुधारणा करू. आम्ही नेहमीच शासन निर्णयांचा आदर करतो आणि कामगार हिताचा विचार करतो, असे लेखी पत्र कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख दिनेश मधुकर बडगुजर यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच प्रदीप नाईक यांना दिले.

मुंगी इंजिनिअर्स कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताची भूमिका घेतल्यामुळे त्या कंपनीविरुद्ध राज्य शासन व अंमलबजावणी संचालनालयाकडे केलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. तथापि, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना दिलेला शब्द पाळला नाही व कामगारांवर अन्याय झाला तर पुन्हा आपण कामगारांच्या हक्कांसाठी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.