Pimpri news: विधानसभेचे तिकीट नाकारणे अजित गव्हाणे यांना पडले महागात !

पालिकेची निवडणूक 15 महिन्यावर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.शहराध्यक्षाची भूमिका ठरली निर्णायक; राष्ट्रवादीकडून महेश लांडगेंना गोंजारने सुरूच?

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – विधानसभा निवडणुकीत भोसरीत पक्षाचा अधिकृत उमेदवार नसणे, अजित गव्हाणे यांनी तिकीट नाकारणे, पालिका निवडणुकीतील भोसरीतील कामगिरी, पक्ष संघटनेतील कमी सहभाग असे विविध मुद्दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठासून सांगण्यात आले. त्यामुळेच मोक्याच्याक्षणी घात झाला आणि विरोधी पक्षनेते पदासाठी सर्वांत अग्रेसर असणारे गव्हाणे यांचे नाव मागे पडले. यात भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे शेलारमामा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित गव्हाणे यांना पद नाकारून आमदार लांडगे यांचे जिवलग मित्र असलेल्या राजू मिसाळ यांना पद दिल्याने राष्ट्रवादी अजूनही महेश लांडगेंना गोंजारत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठी गटबाजी उफाळून येईल, असे बोलले जात आहे.

पालिकेची निवडणूक 15 महिन्यावर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रबळ दावेदार अजित गव्हाणे यांना सरस ठरत राजू मिसाळ यांनी बाजी मारली आहे. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली असून राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता असतो.

या पदासाठी भोसरीतील जेष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे प्रबळ दावेदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात देखील त्यांचेच नाव घोळत होते. पण, शहरातील स्थानिक पक्षश्रेष्ठींनी सर्व परिस्थिती ठासून सांगितली.

विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला ‘भोसरीचे हित गव्हाणे अजित’ असा नारा ऐकायला मिळाला. विलास लांडे यांनी पक्षाचे चिन्ह नाकारल्यानंतर अजितदादांनी गव्हाणे यांना उमेदवारी घेण्याचा आग्रह केला होता.

निवडणुकीनंतर दादांनी तसे बोलून दाखवले होते. पक्षाला गरज असते तेव्हा पुढे येत नाहीत. अडचणीत पक्षाच्या हाकेला साथ दिली नसल्याचे मुद्दे यावेळी विचारात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

काका विलास लांडे यांच्यासाठी गव्हाणे यांनी विधानसभेला माघार घेतली होती. त्याचे राजकीय परिणाम गव्हाणे यांना मोजावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

पक्ष संघटनेपासून फटकून राहणे, जेष्ठ असूनही सभागृहातील कमी उपस्थिती, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कमी बोलणे याचाही फटका गव्हाणे यांना बसला असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

अजित पवार आणि भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे अद्यापही मधूर संबंध आहेत. ते एकमेकांवर टीका करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे तर महेश लांडगे यांचे शेलारमामा आहेत.

गव्हाणे यांना विरोधी पक्षनेतेपद दिले असते तर त्यांनी आमदार लांडगे यांच्यावर टीकास्त्र सोडले असते. विरोध केला असता, हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

राजू मिसाळ हे लांडगे यांचे जिवलग मित्र आहेत. त्यामुळे ते लांडगे यांच्यावर हल्ला करण्याची शक्यता कमीच आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार अद्यापही महेश लांडगे यांना गोंजारत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. अजित गव्हाणे यांना पद नाकारल्याने भोसरीकर नाराज झालेत. महिलेला संधी मिळावी यासाठी आग्रही असणाऱ्या वैशाली घोडेकर देखील साहजिकच नाराज असणार आहेत.

त्यामुळे अगोदरच शहरात खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी उफाळून येईल, अशी परिस्थिती आहे.

पार्थ पवार यांची शिफारस ठरली भारी !

सातत्याने पक्ष नेतृत्वाशी संपर्क, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या प्रचारात हिरिरीने सहभाग, पक्षाच्या आंदोलनात सहभागी होणे, एकदा इच्छा व्यक्त केल्यानंतर कोणतेही लॉबिंग न करणे आणि पार्थ पवार यांची शिफारस यामुळेच मिसाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागल्याची पक्षात चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.