Pimpri News: अण्णाभाऊ साठे महामंडळास वाढीव 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल त्वरित द्या, अन्यथा आंदोलन – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास वाढीव 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल त्वरित द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल देण्याबाबत गोरखे यांनी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे आहे. तसेच अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वाया गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास 1200 कोटी रुपयांचे भागभांडवल त्वरित महामंडळाला देऊन महामंडळ ताबडतोब चालू करावे.

राज्य सरकारकडून मिळणाऱ्या भागभांडवला मधून 1 लाख ते 5 लाख रुपये पर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ सुरू करावी. बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा 7 लाख रुपये वरून 10 पर्यंत करण्यात यावी. त्यामध्ये महामंडळाचा हिस्सा 20% ऐवजी 45% इतका व बँक कर्ज 50%तसेच लाभार्थी हिस्सा 5% असा करून तात्काळ शासन निर्णय काढून योजना पूर्ववत सुरू करावी.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर 10 लाख रुपये पर्यंतची व्याज परतावा योजना या महामंडळास तात्काळ सुरू करावी. अन्यथा महाराष्ट्र भर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोरखे यांनी दिला आहे.

पहिल्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेले 100 कोटी रुपये अजूनही मंडळाला प्राप्त झाले नाहीत याची ही आठवण त्यांनी करून दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.