Pimpri news: शहरात ‘रेमडेसिवीर’चा पुरवठाधारक नेमून खासगी रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करा – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये त्वरीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठाधारक नेमावा. त्यांच्या मार्फत शहरातील खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे.

याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे. त्यात ढाके यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे दरदिवशी सुमारे तीन हजारच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयाव्यतिरिक्त शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड – 19 रुग्ण दाखल होत आहेत.

रुग्णसंख्या वाढल्यामुळे शहरातील बऱ्याच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासू लागली आहे. परंतु, शहरातील खासगी औषध दुकानदारांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्रीसाठी बंदी घातल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव होताना दिसत आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोविड – 19 रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव कमी करण्यासाठी 9 एप्रिल रोजी शहरातील खासगी रुग्णालयांनी संबंधित कंपनीच्या पुरवठादाराकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रोटोकॉलनुसार नोंदवून पुरवठा करण्यात येईल, असे घोषित केले होते. तसेच, यासाठी ‍नियंत्रण कक्ष देखील उभारण्यात आला होता. परंतु, या निर्णयानुसार याबाबतीत कुठलीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या उलट परिस्थिती आणखीनच गंभीर झालेली आहे.

शहरातील एकाही कोविड-19 च्या रुग्णालयांना अद्यापपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. यामुळे शहरातील कोविड रुग्णालये व रुग्णांच्या नातेवाईकांची अजूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव होताना दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.

यावर तातडीने उपाययोजना म्हणून खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये त्वरीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठाधारक नेमून त्यांच्या मार्फत शहरातील खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.