Pimpri News: महापालिकेच्या पायाभूत सुविधांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठीच्या समितीवर गृहनिर्माण फेडरेशनच्या पदाधिका-याची नियुक्ती करा

पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पायाभूत सुविधांसाठीच्या रोजच्या कामांवर लक्ष ठेवणाऱ्या समिती/ किंवा संलग्न खात्याशी थेट समन्वय साधण्यासाठी गृहनिर्माण फेडरेशनच्या तटस्थ प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. त्यासाठी समित्यांवर तटस्थ प्रतिनिधी नेमण्याची मागणी पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात महासंघाने म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात पायाभूत सुविधांसाठीची विविध विकासकामे चालू असताना बऱ्याच प्रकारच्या अडचणींना संपूर्ण शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. गेली बरेच महिने शहरातील रस्त्यांची दुरुस्तीची, नवीन बांधणीची कामे सुरु आहेत. ही कामे सुरु असताना शेकडो वेळा रस्त्यावरील भूमिगत केबल्स, गटारे यांची तोडफोड अजाणतेपानाने किंवा जाणून बुजून होत आहे.

फेडरेशनने शेकडो वेळा अशा समस्यांविरोधात गा-हाणे सोशल मीडियावर त्या-त्या प्रभागातील लोकप्रतिनींधी समोर मांडले आहे. परंतु, बऱ्याच वेळा शहरवासीयांच्या या गाऱ्हाण्यांना दुर्लक्षित केले गेले आहे. शहरातील अशा प्रकारचा पायाभूत सुविधांचे काम सुरु असताना शहरवासीयांचा तेथील पालिकेच्या लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त तटस्थ म्हणून स्वायत्त संस्थांचे प्रतिनिधित्व असावे अशी पिंपरी- चिंचवड गृहनिर्माण संस्थांच्या संघाची मागणी आहे.

शहरातील पायाभूत सुविधांच्या कामावर लक्ष ठेवताना निर्देश देणाऱ्या समितीमध्ये फेडरेशन पदाधिकारी मधील 1 ते 2 प्रतिनिधींना या अशा समितीमध्ये स्थान असावे. या अशा सदस्यांना तसे काही अधिकार किव्वा निर्देश देण्याचे अधिकार असावेत. जेणेकरून शहरवासीयांना होणाऱ्या या त्रासांमध्ये कमतरता होईल. जी गेली अनेक वर्षे दुर्लक्षित केली जात आहेत. शहरातील काँक्रीटीकरणाचे काम सुरु असताताना अशा रस्त्यांवरील महावितरणच्या विजेच्या भूमिगत केबल्स तुटून 30 ते 36 तास विजेचा अभाव निर्माण होणे. या विजेच्या लपंडावामुळे लहान मुलांची ऑनलाईन शाळा, क्लास, ऑनलाईन काम करणे ह्या गोष्टींपासून शहरवासीयांना मुकावे लागत आहे.

रस्त्याचे काँक्रीटीकरण चालू असताना रस्ता निसरडा होऊन भयानक अपघात होणे. अशी कामे असताना नियमानुसार रस्त्याच्या दुतर्फा सरंक्षक व्यवस्था न करणे, ज्यामुळे आणखी अपघात घडणे. अशा अनेक समस्यांना सोसायटी मधील रहिवासीयांना रोज सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या समितीमधील सहभागातून फेडरेशन विविध कामांवर लक्ष ठेऊन लोकांना होणारा त्रास कमी करु इच्छित आहे. परंतु, संपूर्ण जवाबदारी ही महापालिकेची आणि अधिकृतरित्या पद ग्रहण केलेल्या जवाबदार व्यक्तीचीच राहील. फेडरेशन म्हणून आम्ही फक्त मदत करू इच्छित असल्याचे फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.