Pimpri News: स्पाईन रोड बाधितांच्या पुनर्वसनासाठी सल्लागाराची नेमणूक

मालमत्ताधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पीसीएनटीडीए मार्फत मोशी सेक्टर 11 येथील भुखंड पिंपरी - चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – त्रिवेणीनगर, तळवडे येथील स्पाईन रोड बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) कडून मोशी सेक्टर 11 येथील भुखंड पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. पुनर्वसित केल्या जाणा-या नागरिकांना महापालिका पायाभूत सुविधा पुरवणार आहे. या कामासाठी पालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराला प्रकल्प किमतीच्या 1.19 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

पीसीएनटीडीएच्या मंजूर विकास योजनेतील भक्ती-शक्ती चौक ते मोशी पर्यंतचा 75 मीटर रूंदीचा रस्ता पीसीएनटीडीएमार्फत अंशत: विकसित करण्यात आला आहे.

या स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर, तळवडे येथील रस्त्याने बाधीत मालमत्ताधारकांनी अद्यापही रस्त्याचा ताबा पीसीएनटीडीएकडे न दिल्यामुळे सद्यस्थितीत या ठिकाणी उर्वरीत लांबीचा रस्ता विकसित करता आलेला नाही.

येथील मालमत्ताधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पीसीएनटीडीए मार्फत मोशी सेक्टर 11 येथील भुखंड पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

हस्तांतरित करण्यात आलेल्या भुखंडाचा ले-आऊटही मंजूर करण्यात आला आहे. या भुखंडामधील रहिवाशांसाठी पायाभुत सुविधा महापालिकेमार्फत विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत या भुखंडाचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, जलनि:सारण, विद्युत आणि सीडी वर्क बाबतच्या आवश्यक बाबींचा अंतर्भाव पायाभूत सुविधांमध्ये करण्यात आला आहे.

त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या आवश्यकतेनुसार, सर्व बाबींचा एकत्रित विचार करून निर्धारीत मानांकनाप्रमाणे नियोजन करणे आणि स्थापत्य विषयक कामांच्या बाबींचे पुर्वगणपत्रक तयार करणे, निविदा संच तयार करणे आणि कामावर दैनंदीन देखरेख करणे आदी निविदापूर्व आणि निविदापश्चात कामे करावी लगणार आहेत.

यासाठी बीआरटीएस विभागामार्फत या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या कामासाठी तीन जणांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी अ‍ॅश्युअर्ड इंजिनिअरींग सर्विसेस यांचा 1.19 टक्के इतका लघुत्तम दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प किमतीच्या 1.19 शुल्क देण्यात येणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान हे प्रेक्षणिय स्थळ असून या ठिकाणी नागरिकांची आणि पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी वाहतुकीसाठी भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. भक्ती-शक्ती उद्यानाची सीमाभिंत काही ठिकाणी पडलेली आहे.

या ठिकाणी उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी नवीन सीमाभिंत बांधणे आवश्यक आहे. या पर्यटन स्थळाची शोभा वाढवून जास्त पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी याठिकाणी सुशोभिकरण करून मजबूत सीमाभिंत बांधण्यात येणार आहे.

या कामासाठीही देखील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून अ‍ॅश्युअर्ड इंजिनिअरींग यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना प्रकल्प किमतीच्या 1.98 टक्के शुल्क देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.