Pimpri News : भीमा कोरेगाव प्रकरण आरोपी असणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा – ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेची मागणी

संभाजी भिडे दहशतवादी असून विद्यमान सरकारने त्यांना व त्यांच्या सर्व चेल्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी

एमपीसी न्यूज – भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने आज (सोमवारी) 12 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संभाजी भिडे दहशतवादी असून विद्यमान सरकारने त्यांना व त्यांच्या सर्व चेल्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भीमा कोरेगाव याठिकाणी 1 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याला संभाजी भिडे व त्याची सहयोगी जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप पर्यंत संभाजी भिडे यांची अटक करण्यात आली नसून त्यांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अमोल डंबाळे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे, एमआयएमच्या अंजना गायकवाड, लढा संघटनेचे प्रमोद क्षिरसागर, अजय लोंढे, महेंद्र सोनवणे सचिन वाघमारे, संतोष निसर्गंध, शिवशंकर उबाळे इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नावे असणारे निवेदन पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले असून त्यामध्ये भीमा कोरेगाव येथील आंदोलनाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेले गुन्हे शासन निर्णयानुसार त्वरित मागे घ्यावे, तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात मधील जाती अत्याचारातून विराज जगताप व संतोष अंगद यांचे हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.

तसेच आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्वच जाती अत्याचाराचे प्रलंबित अर्जावर अंतिम कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.