Pimpri Corona News : कोरोनाची रुग्ण संख्या घटताच ऑक्सिजनची मागणीही निम्याने घटली

आता महापालिका रुग्णालयात दिवसाला 25 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि त्यातही अतिगंभीर, गंभीर रुग्णसंख्येत झालेली वाढ यामुळे ऑक्सिजनची दैनंदिन मागणीही दुपटीने वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत असून ऑक्सिजनची मागणीही कमी झाली. रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजन वापराबाबतच्या उपाययोजनांमुळे बचत झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली.

एप्रिलच्या मध्यात महापालिका रुग्णालयासाठी दिवसाला 50 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. आता दिवसाला 25 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून निम्याने घटली. खासगी रुग्णालयातीलही ऑक्सिजनची मागणी घटली आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा फेब्रुवारी 2021 पासून वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट तीव्र होती. मार्च, एप्रिलमध्ये प्रचंड रुग्णवाढ झाली. दिवसाला तीन हजारहून अधिक रुग्ण वाढत होते. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांची संख्या मोठी होती. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. त्यामुळे ऑक्सिजनची प्रचंड मागणी वाढली.

ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन 50 मेट्रिक टन आणि खासगी हॉस्पिटलला 30 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. या कालावधीत महापालिका प्रशासनाने नियोजन करून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. ऑक्सिजन टँकरच्या सहाय्याने उपलब्ध होईल तेथून ऑक्सिजन आणण्यात येत होता.

मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट होऊ लागली. शहरातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीस आला. रुग्णसंख्या कमी होत दिवसाला 450 पर्यंत खाली आली. यामध्ये गंभीर आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली. परिणामी, ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली.

आता महापालिका रुग्णालय, जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दिवसाला 25 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. एप्रिलच्या तुलनेत 25 टक्यांनी मागणी घटली. रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजनच्या बचतीमुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. दुसरी लाट आता ओसरत असताना कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये. यादृष्टीने महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नवीन आकुर्डी, थेरगाव रुग्णालयासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे म्हणाल्या, “एप्रिल महिन्यात ऑक्सिजनची मागणी वाढली होती. महापालिका रुग्णालयातील मागणी 50 मेट्रिक टनांपर्यंत गेली होती. आजरोजी निम्याने मागणी घटली असून आता 25 टन ऑक्सिजनची मागणी आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजनचे नियोजन करत केलेल्या बचतीमुळे मागणीत घट झाली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जम्बो कोविड सेंटरशी करारनामा नव्हता. वायसीएम रुग्णालयाशी करारनामा होता. त्यामुळे जम्बोला ऑक्सिजन पुरवठा करण्यास अडचणी आल्या”.

“आता खासगी रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी केली जात नाही. अन्न व औषध प्रशासन विभाग पुरवठादारांना लिक्विड ऑक्सिजन मिळेल याची काळजी घेत आहेत. राज्याला गुजरात, रायगडमधून ऑक्सिजनचा पुरवठा झाला. पुणे विभागात पुणे शहर, पिंपरी-चिंचवडची ऑक्सिजनची मागणी जास्त होती. त्यामुळे राज्य सरकारने पुणे विभागाला 30 ते 40 टनाचा कोटा वाढवून दिला होता.

तिसऱ्या लाटेच्या उपयोजना म्हणून नवीन आकुर्डी आणि नवीन थेरगाव रुग्णालयात ऑक्सिजन टँक बसविले आहेत. त्यासाठी ऑक्सिजन पुरवठादारासोबत करारनामा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोणत्या रुग्णालयाला किती ऑक्सिजनचा साठा करता येऊ शकतो. याची माहिती घेण्यात आली आहे. महापालिकेला सिरम इन्स्टिट्यूट रोज 50 सिलेंडर देणार आहे. त्यामुळे तिसरी लाट आली. तरी, आता ऑक्सिजन बाबत काही अडचणी येणार नाही”, असा विश्वास झगडे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.