Pimpri News: अशोक शिलवंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी, संत तुकारामनगर येथील अशोक बँकेचे संस्थापक, माजी भूमी अभिलेख अधीक्षक अशोक शिलवंत यांचे हृदयविकाराच्या धक्याने आज (शुक्रवारी) सकाळी निधन झाले. त्यांचे वय 59 होते.

पिंपरी कॅम्पातील भूमी अभिलेख कार्यालयात ते अधीक्षक म्हणून कार्यरत होते. वर्षभरापूर्वी अशोक शिलवंत सेवानिवृत्त झाले होते. धम्म चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते. संत तुकारामनगर येथे अशोक नागरी सहकारी बँकेची त्यांनी संस्थापना केली होती. समाजातील गरजूंना मदतीसाठी ते नेहमी तप्तर असत. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराच्या धक्का बसला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी आमचे मित्र, सहकारी बंधुतुल्य आणि धम्म चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते अशोकराव शीलवंत यांचे निधन धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्यामुळे बौद्धांच्या सांस्कृतिक चळवळीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. सम्राट अशोकाचे पाईक म्हणून त्यांनी मागील दोन दशकांपासून केलेले विलक्षण काम कायम स्मरणात राहील. एका दिलदार व हसतमुख सहकाऱ्याला आम्ही आज गमावले आहे. त्यांच्या जाण्यामुळे शीलवंत कुटुंबीयांवर जो आघात झालेला आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती तथागत गौतम बुद्धांनी त्यांना द्यावी, अशी तथागता चरणी प्रार्थना! या शब्दात शिलवंत यांना श्रद्धांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.