Pimpri News: एका दिवसात 30 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण, अभियंत्याचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज – एका दिवसात सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या 30 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा विक्रम नुकताच पार पडला. त्याकरीता लागणारी यंत्रसामुग्री आणि कामासाठी लागणारे मटेरियल याचे सूक्ष्म नियोजन करणारे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथील अभियंता सोमनाथ रुपनवर यांचा आज (सोमवारी) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते शाल, पुस्तक आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ड प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर उपस्थित होते. तसेच उपमहापौर हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, पदाधिकारी, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप आदी ऑनलाईन उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, 150 वाहने 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून एका दिवसात 30 किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्याचा हा विश्वविक्रम केला आहे. या कामाचे नियोजन शहरातील अभियंता सोमनाथ रुपनवर यांनी दोन महिन्यांपासून केले असल्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला. या विक्रमी कामगिरीबद्दल अभियंता सोमनाथ रुपनवर त्यांचा शहराला सार्थ अभिमान वाटत आहे.

अभियंता सोमनाथ रुपनवर यांचे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देखील कौतुक करण्यात आले आहे. डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे भाग करण्यात आले होते प्रत्येक भागासाठी एक प्रोजेक्ट मॅनेजर आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वांनी एकजूटीने काम करुन हा विक्रम केला असून या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली जाणार असल्याची माहिती अभियंता रुपनवर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.