Pimpri News : सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे दिव्यांग कक्षाची जबाबदारी

एमपीसी न्यूज – पालिकेच्या अपंग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दिव्यांग कक्षाची स्वतंत्रपणे निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात आले नव्हते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला. मात्र, त्या कक्षासाठी सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली नव्हती. बुधवारी (दि. 9) अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आदेश काढला. त्यात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे या कक्षाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

अपंग कल्याणकारी योजना कक्ष आणि पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्तांच्या नेमणुकीचे भिजत घोंगडे मागील अनेक दिवसांपासून आहे. राज्य शासनाचे आदेश आणि पालिकेचा ठराव होऊनही प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी केली जात नव्हती. यामुळे शहरातील हजारो दिव्यांगांची हेळसांड होत होती.

सर्व महापालिकांनी अपंग कल्याण कक्षाची स्थापना करून उपायुक्तांवर त्याची जबाबदारी सोपवावी. या निर्देशाचे तत्परतेने पालन करावे, असे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिले होते. पिंपरी पालिकेत त्याची मागील तीन वर्षांपासून अंमलबजावणी झाली नव्हती.

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे शहरातील दिव्यांग बांधवांना सुविधा देण्यासाठी नागरवस्ती विकास विभागाकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. नागरवस्ती विकास विभागाकडे अगोदरच विविध योजनांचा भार आहे. त्यात अपंग कल्याणकारी योजनेचा देखील भार देण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.