Pimpri News : नितीन लांडगे आणि सहकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि परिवाराचा मागील इतिहास पाहिला असता या परिवाराने राजकारण न करता समाजकारण केले. त्यामुळे कालचा प्रकार हा नितीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्था योग्य तो न्याय करेल असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार महेश लांडगे यांनी पुणे न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना दिली. 

आमदार लांडगे म्हणाले की, लांडगे परिवाराचा समाजामध्ये फार मोठा आदर्श आहे. या परिवाराची भोसरी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शेकडो एकर जागा आहे. चांगले उद्योग व्यवसाय आहेत. ज्यांनी कुणी हा प्रकार केला, त्यांनी प्लॅनिंग करून केले. याच कुठलेही पुरावे नाहीत, रेकॉर्डिंग नाही, जागेवर पकडले, असही काही नाही. त्यांनी स्वतः पैशाची मागणी केली, असा कुठलाही पुरावा नाही. त्यांना अडकवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल हे बऱ्याच विरोधकांना दिसते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा एक कट आहे. महापालिकेतील प्रथम श्रेणीपासून ते चतुर्थश्रेणीपर्यंत अशा सर्व कर्मचाऱ्यांना विचारले तर तेसुद्धा सांगतील की, नितीन लांडगे हे स्वच्छ चारित्र्याचे व्यक्ती आहे. अशा प्रकारचे कृत्य करून विरोधकांनी राजकारण अगदी खालच्या थराला नेऊन ठेवले आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.