Pimpri News: महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व सुसंगत संदेश रेखाटा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही संताच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ही पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राच्या आजूबाजूस आहे. त्यामुळे महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व सुसंगत संदेश रेखाटण्यात यावेत अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी महामेट्रोकडे केली आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांना महापौर उषा ढोरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही संताच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ही पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राच्या आजूबाजूस आहे. तसेच राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, संत, महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा देखील आपणास इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरामध्ये उभारण्यात येणा-या महामेट्रो मार्गावरील पोलवर म्युरलमध्ये आकर्षक व रंगीत प्रकाश व्यवस्थेसह वारकरी सांप्रदायाचा इतिहास, परंपरा दर्शविणारी भित्तीचित्रे, संतांचे अभंग, ओव्या, संत वचने आणि प्रसिद्ध व लोकप्रिय महापुरुषांचे विचार, सुवचने रेखाटणे योग्य व सुसंगत ठरणार आहे.

रस्त्यांवरुन प्रवास करणा-या प्रवाशांसह पायी ये-जा करणा-यांना देखील प्रेरक व उत्तम विचार वाचून प्रेरणा मिळणार आहे. राष्ट्रपुरुष, थोर समाजसुधारक, संत, महापुरुषांचे विचार महामेट्रो मार्गीकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यत पोहचण्यासह महामेट्रो मार्ग देखील आकर्षक व सुशोभित होण्यास मदत होणार असल्याने महामेट्रो मार्गीकेवर कायमस्वरुपी विविध सचित्र संदेश रेखाटून त्यावर आकर्षक व रंगीत प्रकाशव्यवस्था करणेबाबत महामेट्रोस कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.