Pimpri News: कोविड सेंटरच्या खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ, हाच का पारदर्शक कारभार? – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात उभारलेल्या कोविड सेंटरसाठी आतापर्यंत किती खर्च केला आहे. तसेच कोणत्या शिर्षाखाली हा खर्च करण्यात आला. याची महिन्याभरापूर्वी माहिती मागविली असूनही प्रशासनाने अद्यापर्यंत ती दिली नाही. कोविड सेंटरच्या खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हाच पारदर्शक कारभार आहे का, असा सवाल शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना कलाटे म्हणाले, शहरात सुरू असलेल्या कोविड सेंटरच्या खर्चाबाबत एक महिन्यापूर्वी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून माहिती मागविली.

मात्र, महापालिका प्रशासनाने पत्रावर कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच येत्या काही दिवसांत महापालिका आपले पाच कोविड सेंटर बंद करणार आहे. त्यातील म्हाळूंगे येथिल कोविड सेंटर महापालिकेने बंद केले आहे. मात्र, हे कोविड सेंटर बंद करताना कोणते निकष लावले आहेत.

आर्थिक निकषांवर कोविड सेंटर बंद केले जाणार आहे की रुग्ण संख्येच्या आधारावर बंद केले जाणार आहेत, हे अद्याप महापालिकेने स्पष्ट केले नाही. महापालिकेने या सर्व गोष्टींची तातडीने माहिती द्यावी, अशी मागणी महापालिका आयक्तांकडे केली आहे.

एक महिन्यापूर्वी कोविड सेंटरची माहिती मागविली होती. अद्याप ती मिळालेली नाही. कोणते सेंटर बंद करणार, कोणत्या निकषांवर बंद करणार हेही महापालिकेने स्पष्ट केले नाही.

या उलट ज्या कोविड सेंटरवर जास्त खर्च होत आहे, असे सेंटर सुरू ठे‌वून कमी खर्च येणारे सेंटर बंद करण्याचे काम महापालिका करत आहे. त्यामुळे महापालिकेने या सर्व गोष्टींचा खूलासा करून सर्वसामान्य शहरवासियांच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी कलाटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.